मुंबई : World Cup 2019 क्रिकेट विश्वचषकामध्ये सुपरहिट रविवारचीच चर्चा सुरु आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्ये संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. एकिकडे मैदानावर या दोन्ही संघांमध्ये होणारी चुरसीची लढत पाहण्यासाठी क्रीडारसिकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर, क्रिकेटच्या मैदानाबाहेरही असंच काहीसं वातावरण पाहायला मिळत आहे.
कलाविश्वापासून सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असणाऱ्या विषयांमध्येही अग्रस्थानी आहे तो म्हणजे भारत- पाकिस्तान क्रिकेट सामना. या सामन्यासाठी शिगेला पोहोचलेली एकंदर उत्सुकता पाहता काही कलाकार मंडळी मागे राहिली नाहीत. 'बिइंग इंडियन' या युट्युब वाहिनीतर्फे पोस्ट करण्यात आलेला व्हिडिओ पाहता लगेचच याचा अंदाज येत आहे.
पाकिस्तानी रॅपर अली गुल पीर याच्यासोबत एकत्र येत 'बिइंग इंडियन'च्या कलाकारांनी एक 'रॅप बॅटल' सादर केलं आहे. 'रॅपबाजी' असं नाव देत त्यांनी ही शाब्दिक जुगलबंदी सर्वांच्या भेटीला आणली आहे. ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही संघाचे चाहते कोणत्याही माध्यमातून एकमेकांसमोर आल्यावर त्यांच्यामघध्ये नेमकं काय नातं पाहायला मिळतं याची झलक या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे.
पाकिस्तानचा रॅपर आणि त्याचे साथीदार त्यांच्या परिने संघाच्या कामगिरीची वाहवा करत आहेत. तर त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर इथे भारतीय चाहतेही त्याच शैलीत पाकिस्तानला कशा प्रकारे भारतीय क्रिकेट संघाने आजवर अनेकदा पराभूत केलं आहे, याची आठवण करुन देत आहेत. अतिशय धमाल आणि मनोरंजक अशा या व्हिडिओमध्ये भारत- पाकिस्तानमधील कलाकारांची ही कामगिरी पाहता, हे रॅप बॅटल चर्चेत नेमकं इतकं का गाजतंय याचा सहज अंदाज लावता येत आहे.