दिल्ली : दिल्लीतील डॉक्टरांनी एक असं ऑपरेशन केलंय ज्याची कल्पना करणंही फार कठीण आहे. फोर्टिस मेमोरियल रिसर्च इंस्टीट्यूटचे सीटीवीएसचे प्रमुख आणि संचालक डॉक्टर उद्गीथ धीर यांनी एका रूग्णाच्या शरीरातून तब्बल 14 किलोंचा ट्यूमर बाहेर काढला आहे. या उपचारांमुळे या डॉक्टरांनी एक इतिहास रचला आहे.
डॉक्टर उद्गीथ धीर यांनी सांगितलं की, हे त्यांच्यासाठी एक मोठं आव्हान आहे. कारण यापूर्वी त्यांनी 9 किलोपेक्षा मोठा ट्यूमर पाहिला नाही किंवा अशा गोष्टीबाबत ऐकलंही नाही. सुमारे 50 दिवसांच्या उपचारानंतर आणि सुमारे 8 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर, या रूग्णाच्या शरीरातून ट्यूमर काढला गेला.
डॉक्टरांनी सांगितलं की, रूग्ण दिवेश याच्या उपचारांच्या वेळी त्याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी अजिबात हार मानली नाही. प्रत्येक टप्प्यावर त्याला साथ दिली. केवळ धीर, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर ते हे असंभव वाटत असलेलं काम शक्य झालं आहे.
डॉक्टरांनी पुढे सांगितलं की, या प्रकरणाची गुंतागुंत अधिक होती. परंतु तरीही हे कठीण काम यशस्वीरित्या पूर्ण झालं. कॅन्सरच्या उपचारांत जगासाठी ही एक प्रगती आहे. कारण एकदा कॅन्सरचा हा प्रकार शरीरातून निघून गेल्यानंतर, त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता जवळजवळ संपते. मात्र 1 लाख पैकी 1 व्यक्तीला पुन्हा हा त्रास होण्याची शक्यता असते.
नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्रामच्या अहवालानुसार, 2020 मध्ये भारतात सुमारे 1.4 दशलक्ष कॅन्सरच्या प्रकरणांची नोंद करण्यात आली होती. डब्ल्यूएचओच्या मते, तंबाखू न वापरणे, सक्रिय जीवनशैली राखणं आणि एचपीव्ही विषाणूविरूद्ध लसीकरण करून कॅन्सरचा धोका 30 टक्के ते 50 टक्के कमी केला जाऊ शकतो.