Marburg Virus : गेली दोन अडीच वर्ष जगभरात थैमान घालणारा कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तो पूर्णपणे संपलेला नाही. चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनाची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. कोरोनाचा धोका कायम असतानाच आता जीवघेणा व्हायरस सापडला आहे. कोरोना आणि इबोलापेक्षाही (Ebola) हा व्हायरस धोकादायक मानला जात आहे. या व्हायरसचं नाव आहे मारबर्ग. (Marburg Virus)
पश्चिम आफ्रिकन देश घाना (Ghana) इथल्या दोन लोकांना या जीवघेण्या व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यासोबतच संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 98 लोकांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे. मारबर्ग व्हायरसवर अद्याप कोणतीही लस किंवा उपचार अस्तित्वात नसल्याचं सांगण्यात येत आहे.
मारबर्ग विषाणूची घाणातल्या आरोग्य अधिकाऱ्यांनीही माहिती दिलीआहे. पश्चिम आफ्रिकेतील घाना या देशात इबोलासारखा धोकादायक विषाणू सापडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. जुलैच्या सुरुवातीला घानाच्या एशेंटी प्रदेशात राहणाऱ्या दोन व्यक्तींना या धोकादायक विषाणूची लागण झाल्याचा संशय आला होता. त्यानंतर त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यांच्यामध्ये मारबर्ग विषाणू सापडल्याचं सांगण्यात आलं आहे.
मारबर्ग विषाणू संसर्गाची लक्षणं
घाना आरोग्य सेवेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मारबर्ग विषाणूवर अद्याप कोणतंही औषध किंवा लस नाही. हा विषाणू इबोलासारखाच प्राणघातक आहे. मारबर्ग विषाणूची लागण झालेल्या लोकांना उच्च ताप तसंच अंतर्गत आणि बाह्य रक्तस्त्राव होतो.
संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास लोकांनी ताबडतोब स्वतःला विलगीकरणात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या विषाणूमुळे खूप ताप आणि डोकेदुखी होऊ शकते. तसंच या विषाणूमुळे मृत्यूचं प्रमाणही जास्त आहे. पूर्वी हे प्रमाण 24 टक्के होते, मात्र आता ते 88 टक्के इतकं आहे.
प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतो विषाणू
घानामध्ये आतापर्यंत संक्रमित लोकांच्या संपर्कात आलेल्या 98 लोकांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे. दोन प्रकरणांव्यतिरिक्त मारबर्ग विषाणूच सध्या कोणतेही नवीन प्रकरण आतापर्यंत नोंदवली गेलेली नसल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. यापूर्वी सप्टेंबर 2021 मध्ये, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गिनीमध्ये या विषाणूचे पहिले प्रकरण नोंदवलं होतं.
यापूर्वी अंगोला, कांगो, केनिया, दक्षिण आफ्रिका आणि युगांडा इथं या विषाणूचे रुग्ण आढळले होते. मारबर्ग बाधित प्राण्यांच्या माध्यमातून ते माणसांमध्ये पसरत असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्राण्यांमध्ये वटवाघळांचाही समावेश आहे. लोकांना वटवाघुळांचे वास्तव्य असलेल्या गुहांमध्ये जाण्याचे टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच, संपूर्ण स्वच्छ केल्यानंतरच सर्व प्रकारचे मांस खावं असं आवाहनही करण्यात आलं आहे.