मुंबई : लहान मुलांचं लसीकरण केव्हा सुरु करणार असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. मात्र आता लवकरच लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात केली जाणार असल्याची शक्यता आहे. बिहारमध्ये लहान मुलांच्या लसींच्या ट्रायलला सुरुवात करण्यात आली आहे. बुधवारी पाटण्यातील एम्समध्ये तीन मुलांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. यामध्ये 2 ते 18 वर्षांच्यामधील 3 मुलांना लस देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसीची लहान मुलांवर क्लिनिकल ट्रायल करण्यात आली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियातर्फे लहान मुलांना कोवॅक्सिनच्या क्लिनिकल ट्रायलसाठी 11 मे रोजी मंजूरी दिली होती. यावेळी लहान मुलांवर लसीच्या क्लिनिकल ट्रायलसाठी कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्यात आला नाही. पालक त्यांच्या मुलांना स्वेच्छेने लसीकरणासाठी घेऊन येत असल्याचं दिसून आलं.
दरम्यान बुधवारी 2 ते 18 वर्षांमध्ये असलेल्या ज्या मुलांना लस देण्यात आली आहे, त्या मुलांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये मुलांचं आरटीपीसीआर आणि शरीरातील अँटीबॉडीज तपासण्यात आले. सर्व काही ठीक असल्याचं लक्षात आल्यानंतरच या मुलांना लस टोचण्यात आली. पाटणा ए्म्सने 100 लहान मुलांना कोरोना लसीचं क्लिनिकल ट्रायल देण्याचं लक्ष्य ठेवलं असल्याची माहिती आहे.
अहवालांच्या माहितीप्रमाणे, लस टोचल्यानंतर कोणत्याही बालकांना कोणतेही दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत. ज्या मुलांना लस देण्यात आली आहे त्यांना 28 दिवसांनंतर पुन्हा लस देण्यात येणार आहे.
देशात कोरोनाच्या दुसरी लाटेने थैमान घातलं. या परिस्थितीतून देश हळू-हळू सावरत असून कोरोनाच्या नव्या प्रकरणांमध्येही घट दिसून येतेय. दुसऱ्या लाटेचा प्रभाव बिहारमध्येही पहायला मिळाला. आता बिहारमध्ये देखील कोरोनाच्या केसेसमध्ये घट झालेली दिसून आलीये. आतापर्यंत राज्यात 18 वर्षांच्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना लस देण्यात येत आहे.