मुंबई : कोरोनाचा नवा व्हेरिएंट XE ची अखेर भारतात एन्ट्री झाली आहे. देशातील गुजरातमध्ये या व्हेरिएंटचं पहिलं प्रकरणं सापडलं आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून याला दुजोरा देण्यात आला आहे. भारतात या व्हेरिएंटची एन्ट्री झाल्यामुळे आरोग्य तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. यानंतर केंद्र सरकारने केरळ, दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र आणि मिझोरामसाठी अलर्ट जारी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, XE व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रूग्णाची प्रकृती कशी आहे याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. 60 वर्षाच्या एका जेष्ठ व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानुसार 11 मार्च रोजी त्याची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली. त्यानंतर त्याचे सँपल जीनोम सीक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले. यामध्ये नवा व्हेरिएंट XE चे अंश असल्याचं दिसून आलं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने राज्याबाहेर प्रवास केला आहे की नाही याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही.
जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की, युकेच्या काही भागांमध्ये याची प्रकरणं दिसून आली आहेत. आतापर्यंत असलेल्या माहितीनुसार, स्टील्थ ओमायक्रॉनपेक्षा हा व्हेरिएंट 10 पटीने अधिक संक्रामक असू शकतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात, XE व्हेरिएंट हा हायब्रिड व्हेरिएंट म्हणून सूचित केला आहे. हा ओमायक्रॉनचा BA.1 आणि BA.2 यांच्या मिश्रणाने तयार झालेला व्हेरिएंट आहे. यापूर्वी देखील व्हेरिएंटचं मिश्रण पाहायला मिळालं होतं.
कोरोनाचा XE व्हेरिएंट हा अधिक धोकादायक मानला जातोय. मात्र, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दोन व्हेरिएंट्स एकत्रिय येणं ही चिंतेची बाब नाही. युकेच्या हेल्थ एजंसीच्या प्रमुख डॉ सुसान हॉपकिंस यांच्या म्हणण्याप्रमाणे, कोणत्याही कोरोना व्हेरिएंट्ससोबत दुसऱ्या व्हेरिएंटचं मिश्रण हे धोकादायक नाही. मात्र तरीही याला हलक्यात घेऊ नये.
जागतिक आरोग्य संघटनेने या नव्या व्हेरिएंटचा धोका पाहता त्याला 'व्हेरिएंट ऑफ कंसर्न' या श्रेणीत वर्गीकृत केलं आहे. या व्हेरिएंटबाबत जास्त माहिती नसल्याने त्याचा धोका किती असू शकतो हे सांगू शकत नाही, असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.