Corona Vaccine Precaution Dose : भारतात येत्या 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांहून अधिक वयोगटातील लोकांना लशीचा तिसरा म्हणजे बूस्टर डोस दिला जाणार आहे. यासाठी पात्र असलेल्या व्यक्तींनी आधी ज्या लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्याच लसीचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं की, कोरोना लसीकरण केंद्रं म्हणून कार्यरत असलेली खाजगी रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कर्मचारी त्यांच्या स्वतःच्या रुग्णालयात लसीकरण करू शकतात. यासाठी पात्र कर्मचार्यांना विनामुल्य बूस्टर डोस देऊ शकतात किंवा त्यासाठी शुल्क देखील आकारू शकतात.
बूस्टर डोस देण्याबाबत आरोग्य मंत्रालयाने काही मार्गदर्शक तत्वेही प्रसिद्ध केले आहेत.
- Comorbidity असल्याचे दाखवण्यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र, प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बुस्टर डोस घेण्यात यावा
- ज्यांनी दुसरा डोस घेऊन 9 महिने झाले असतील अशांना हा बुस्टर डोस देण्यात येणार आहे.
आतापर्यंत 148 कोटींहून अधिक डोस
राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत लोकांना लसींचे 148 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. 91 टक्के प्रौढ लोकसंख्येला किमान एक डोस दिला गेला आहे. तर 66 टक्के लोकसंख्येचं संपूर्ण लसीकरण झालं आहे. 15 ते 18 वर्षे वयोगटातील 17 टक्क्यांहून अधिक किशोरवयीन मुलांना लसीकरण सुरू झाल्यापासून तीन दिवसांच्या आत पहिला डोस देण्यात आला आहे.