'या' देशांमध्ये कोरोना व्हायरसला 'नो एंट्री', वैज्ञानिक देखील हैराण

जवळपास एक महिना लोटला तरी काही देशांमध्ये कोरोनाचा एकही रूग्ण अढळलेला नाही.

Updated: Feb 17, 2020, 07:23 PM IST
'या' देशांमध्ये कोरोना व्हायरसला 'नो एंट्री', वैज्ञानिक देखील हैराण

मुंबई : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये उदयास आलेल्या या व्हायरसने आतापर्यंत अनेकांचे प्राण घेतले आहे. एवढचं नाही तर जगातील अनेक लोकांना कोरोना व्हायरसची लागन झाली आहे. दिवसागणिक कोरोना व्हायरसच्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याचप्रमाणे मृत्यूच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. एकंदर परिस्थिती पाहता. जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली. 

परंतु, काही देशांमध्ये अद्याप कोरोनाचा एकही रूग्ण सापडलेला नाही. त्यामुळे वैज्ञानिक देखील हैराण झाले आहेत. अंतरराष्ट्रीय संस्था 'जॉन हॉप्किन्स'च्या वृत्तानुसार कोरोना व्हायरस चीन बाहेरील राष्ट्रांमध्ये पसरलेला आहे. भारतासह चीनमधील सर्व शेजारच्या देशांव्यतिरिक्त अमेरिका, युरोप, दक्षिण आशिया आणि रशियामध्येही कोरोना व्हायरसचा फैलाव झाला आहे. 

परंतु, आफ्रिका आणि ब्राझीलसह दक्षिण अमेरिका सारख्या देशांमध्ये कोरोनाचा एकही रूग्ण समोर आलेला नाही. या देशांमध्ये गर्मीचं प्रमाण अधिक असल्यामुळे या देशात कोरोना व्हायरसचा फैलाव झाला नसल्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे. 

या देशांचे सरासरी तापमान आशियाच्या तुलनेत १५-२० डिग्री जास्त आहे. थंड हवेच्या ठिकाणी हा विषाणू लवकर पसरत असल्याचा दावा जर्मनीच्या वैज्ञानिकांनी केला आहे. ४ डिग्री किंवा त्यापेक्षाही कमी तापमानात हा विषाणू एका महिन्यापेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकतो.

आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे १ हजार ७७० लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर एकुण ७० हजार ५४८ लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे.