रामदेव बाबांच्या अडचणी वाढल्या! 'पतंजली'च्या Veg 'दिव्य दंतमंजन'मध्ये माशांचे घटक; कोर्टाने..

Court Notice To Patanjali Ramdev Baba: या प्रकरणामध्ये याचिकार्त्याने आपण ब्राह्मण असून मागील अनेक वर्षांपासून ही टूथपेस्ट वापरत असल्याचं याचिकेमध्ये नमूद केलं आहे. कोर्टामध्ये याचिका करणारी व्यक्ती स्वत: वकील आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 1, 2024, 03:37 PM IST
रामदेव बाबांच्या अडचणी वाढल्या! 'पतंजली'च्या Veg 'दिव्य दंतमंजन'मध्ये माशांचे घटक; कोर्टाने.. title=
कोर्टाने बजावली नोटीस

Court Notice To Patanjali Ramdev Baba: दिल्ली हायकोर्टाने शुक्रवारी बाबा रामदेव यांना नोटीस बजावली आहे. बाबा रामदेव यांच्याप्रमाणेच पतंजलीच्या दिव्य फार्मसीलाही नोटीसवर उत्तर देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. पतंजलीच्या दिव्य दंतमंजन या हर्बल टूथपेस्टमध्ये मांसाहारी घटक असल्याचा दावा एका याचिकाकर्त्याने केला आहे. टूथपेस्टमध्ये मांसाहारी घटक असतानाही ती शाकाहारी असल्याचा दावा केला जात असल्यावर याचिकाकर्त्याने आक्षेप नोंदवला आहे.

नेमकं काय आहे या टूथपेस्टमध्ये?

वकील यतीन शर्मा यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. पतंजलीच्या दिव्य दंतमंजन या हर्बल टूथपेस्टच्या पाकिटावर हिरव्या सर्कलसहीत हे प्रोडक्ट पूर्णपणे शाकाहारी असल्याचा दावा केला जातो, असं म्हटलं आहे. सामान्यपणे पूर्णपणे शाकाहारी प्रोडक्टसाठी हे हिरवं सर्कल वापरलं जातं. मात्र या टूथपेस्टमध्ये सेपिया ऑफिशिनालिसचा (सामान्य कटलफिशचा अंश असलेला) घटक असल्याचं सांगण्यात आलं आहे. कटलफिशला मराठीमध्ये माखली असं म्हणतात. शर्मा यांच्या याचिकेनंतर कोर्टाने बाबा रामदेव आणि पतंजलीला सदर प्रकरणात उत्तर देण्याची नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

वेबसाईटवरही व्हेज म्हणून मार्क

दिव्य दंतमंजन ही टूथपेस्ट दिव्य फार्मसीच्या माध्यमातून तयार केली जाते. ही टूथपेस्ट पतंजलीच्या वेबसाईटवरही विक्रीसाठी उपलब्ध असून त्यावर ठसठशीत हिरवा सर्कल दाखवण्यात आला आहे. हा सर्कल पदार्थ पूर्णपणे शाकाहारी असेल तर दाखवला जातो, असं याचिकाकर्त्याने म्हटलं आहे. याचिकाकर्ता आणि त्याचे कुटुंबीय मागील बऱ्याच काळापासून 'दिव्य दंतमंजन' टूथपेस्ट वापरतात. ही टूथपेस्ट शाकाहारी आणि वनस्पतीपासून बनवलेली आयूर्वेदीक प्रोडक्ट असल्याने आम्ही सर्वजण ही वापरत होतो असं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे. मात्र नुकतेच या प्रोडक्टमध्ये सेपिया ऑफिशिनालिसचा (सामान्य कटलफिशचा) अंश असल्याचं लक्षात आलं. हा घटक या माशाच्या हाडांपासून तयार केला जातो. यामुळे आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. आमचं कुटुंब ब्राह्मण पार्श्वभूमीचं असून आमच्याकडे मांसाहारी पदार्थ खाणं हे आमच्या धर्मिक भावना आणि संस्कृतीविरुद्ध मानलं जातं, असं याचिकार्त्याने म्हटलं आहे.

आम्ही दुखावलो गेलो आहोत

आपण मागील बऱ्याच काळापासून मांसाहारी घटक असलेली टूथपेस्ट वापरत होतो हे समजल्यानंतर आम्ही दुखावलो गेलो आहोत, अर्ज याचिकाकर्त्याने म्हटलं आहे. या प्रकरणामध्ये न्यायालयाने लक्ष घालून 'दिव्य दंतमंजन' टूथपेस्टमध्ये मांसाहारी घटक असल्यासंदर्भात न्यायनिवाडा करावा अशी अर्जदाराची मागणी आहे. 

रामदेव यांनीही केलेला दावा

याच याचिकेमध्ये बाबा रामदेव यांनी युट्यूबवरील एका व्हिडीओमध्ये 'समुद्र फेन'चा वापर या टूथपेस्टमध्ये केल्याचा दावा केला आहे. हे सुद्धा प्राण्यांमधील घटकांपासून बनवलं जातं. मग ही टूथपेस्ट शाकाहारी कशी? या पेस्टच्या पाकिटावर हिरवा सर्कल का दाखवण्यात आला आहे? असे प्रश्न अर्जदाराने विचारले असून आमच्या भावना लक्षात घेता यासंदर्भात अधिक पारदर्शकता आवश्यक असल्याचं याचिकाकर्त्याने म्हटलं आहे.