नवी दिल्ली: पावसाळा आणि आजारपण हे एक समीकरण झाले असून पावसाळ्यात योग्य आहार न घेतल्यास पोटाचे विकार होण्याची शक्यता असते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दैनंदिन आहारात काही बदल केल्यास आरोग्याच्या काही समस्या कमी होतील. फिटपासचे पोषण व आहार तज्ज्ञ मेहर राजपूत आणि कोलंबिया एशिया हॉस्पिटलचे प्रमुख आहार तज्ज्ञ अदिती शर्मा यांनी पावसाळ्यात होणारे पोटाचे विकारांना आळा घालण्यासाठी काही टिप्स दिल्या.
१. जेवणात लसूण, काळीमिरी, हिंग, आलं, जिरं, हळद आणि कोथिंबीर याचा वापर करावा. कारण त्यामुळे पचन सुधारते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
२. पावसाळ्यात पाणी उकळून पिणे योग्य ठरेल.
३. त्याचबरोबर आहारात मिठाचा वापर कमी प्रमाणात करावा. कारण मिठाच्या अतिरिक्त सेवनामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.
४. पावसाळ्यात मांसाहार शक्यतो टाळावा. परंतु, ते शक्य नसल्यास मटण सूप घ्यावे. मासे खाताना विशेष काळजी घ्या. मांसाहार नीट शिजवून मगच त्याचे सेवन करा.
५. गरम डाळ किंवा सूप पपिणे फायदेशीर ठरेल. जेवण बनवताना हळद, लवंग, काळीमिरी आणि बडीशेप या पदार्थांचा वापर करावा.
६. पावसाळ्यात गरमगरम सूप घेतल्याने पावसाळ्यात होणारे इन्फेकशन, आजार यांच्याशी लढण्यास मदत होते.
७. कच्ची फळे किंवा भाज्या खाणे टाळावे. कारण त्यामुळे अपचन किंवा गॅस सारखे त्रास होऊ शकतात.
८. हळदीत अँटिबायोटिक गुणधर्म असतात. त्यामुळे पचनक्रीया सुरळीत होण्यास मदत होते.
९. जेवल्यानंतर बडीशेप खा. त्यामुळे अन्नपचनास मदत होते व गॅससारख्या समस्या कमी होतात.