बाळाला स्तनपानाने दूध किती वर्ष द्यावे ?

बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला सर्वात आधी आईचे दूध दिले जाते.

Updated: Jun 1, 2018, 01:05 PM IST
बाळाला स्तनपानाने दूध किती वर्ष द्यावे ?  title=

मुंबई : बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला सर्वात आधी आईचे दूध दिले जाते. स्तनपानातून बाळाला मिळणारे दूध हे त्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे किमान सहा महिने बाळाला केवळ स्तनपान करण्याचा सल्ला दिला जातो. मग बाळासाठी अमृताप्रमाणे असणारे दूध स्तनपानाच्या मार्फत किती वर्ष द्यावे? हा विचार तुमच्या मनात डोकावत असेल तर हा सल्ला नक्की जाणून घ्या.  

स्तनपानाचे फायदे 

स्तनपान करण्याचे फायदे नवजात बाळाला आणि आईला अशा दोघांनाही होतात. आईचं दूध हे बाळामध्ये डायरिया आणि उलटीचा त्रास कमी करण्यास मदत करते. 

बाळाला योग्य प्रमाणात स्तनपानाच्या मार्फत दूध मिळाल्यास भविष्यात लठ्ठपणा आणि इतर समस्यांचा त्रास कमी होण्यास मदत होते. 

स्तनपान केल्याने स्त्रीयांमधील ब्रेस्ट कॅन्सर आणि अंडाशयाच्या कॅन्सरचा धोका कमी होतो. 

कोणत्या काळापर्यंत स्तनपान करावे ? 

नॅशनल हेल्थ सर्विसच्या वेबसाईटनुसार, आई आणि बाळ दोन्ही त्यांच्या आवश्यकतेनुसार आणि इच्छेनुसार स्तनपानाचा आनंद घेऊ शकतात. WHO च्या अहवालानुसारही स्तनपान हे किमान सहा महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंत केले जाऊ शकते. 

मुलांना पोषक आहार 

रॉयल कॉलेज ऑफ पेडियाट्रिक्स  अ‍ॅन्ड चाईल्ड हेल्थच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार,स्तनपानातून दोन वर्षांनंतर मुलांना अधिक पोषणतत्व मिळतात याबाबत कोणतेही संशोधन नाही. दोन वर्षांनंतर मुलांच्या आहारात सार्‍याच पोषक घटकांचा समावेश करणं आवश्यक आहे. 
स्तनपानामुळे बाळ आणि आईमध्ये बॉन्डिंग वाढण्यासही मदत होते. मात्र अनेक महिला विशिष्ट टप्प्यानंतर पुन्हा त्यांच्या कामावर रुजू होतात त्यामुळे स्तनपान किती वर्ष चालू ठेवायचा हा सर्वस्वी आईचा निर्णय असू शकतो. 

समज गैरसमज 

2016 सालच्या अंतरराष्ट्रीय स्टडीच्या अहवालानुसार, ब्रिटेनमधील महिला जगात सगळ्यात कमी काळ बाळाला ब्रेस्टफिडींग करतात. सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करण्याबाबत महिलांना लाज वाटत असते याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे सरकारकडूनही सर्वजनिक ठिकाणी खास कक्ष उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.