Menstrual hygiene: मासिक पाळीत महिलांना होणार त्रास अनेकदा असह्य असतो. अनेक महिला मासिक पाळीत विविध पर्याय वापरतात. यामध्ये टॅम्पोन, सॅनिटरी नॅपकीन आणि मेस्ट्रुअल कप यांचा समावेश असतो. अधिकतर महिला सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर करतात. अशावेळी महिलांच्या मनात एक प्रश्न असतो की, सॅनिटरी नॅपकिन्स किती वेळाने बदललं पाहिजे. जर वेळीच पॅड बदललं नाही तर काय होऊ शकतं?
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एका वापरलेल्या पॅडमध्ये बरेच बॅक्टेरिया असतात. त्यामुळे अशा परिस्थितीत हे बॅक्टेरिया आपल्या शरीरात जाण्याची शक्यता असते. हे बॅक्टेरिया आपल्या शरीरात जाऊन महिलांना विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे सॅनिटरी नॅपकिन्स साफ ठेवणं आणि वेळच्या वेळी बदलणं फार गरजेचं आहे.
मुंबईतील सिनियर कंसल्टंट गायनॅकोलॉजीस्ट आणि चव्हाण होममधील डॉ. कोमल चव्हाण म्हणाल्या की, सॅनिटरी नॅपकीन हे कधी बदलायचं हे प्रत्येक महिलेच्या मासिक पाळीच्या फ्लोवर अवलंबून असतं. जर मासिक पाळीचा फ्लो जास्त असेल तर त्यानुसार सॅनिटरी नॅपकीन्स बदलण्याची गरज भासू शकते. साधारणपणे जर फ्लो नॉर्मल असेल तर दिवसातून 2-3 वेळा पॅड बदललं गेलं पाहिजे.
डॉ. कोमल पुढे म्हणाल्या की, जर वेळेत सॅनिटरी नॅपकिन्स बदललं नाही तर काहीवेळा ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. पिरीयड्स ब्लडमुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी रॅशेज होण्याचा धोकाही वाढतो. त्यामुळे वेळच्या वेळी पॅड बदलणं गरजेचं आहे.
सॅनिटरी नॅपकिन्स साफ ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं असतं. यामध्ये तुम्ही नेहमी स्वच्छ हाताने सॅनिटरी नॅपकीन्स हाताळलं पाहिजे. शिवाय वापरलेलं नॅपकिन योग्यरित्या रॅप करून कचऱ्याच्या कुंडीत फेकलं पाहिजे. अशा दिवसांमध्ये सैल कपडे परिधान करणं फायदेशीर ठरेल.