जेवणाआधी आणि नंतर चहा किंवा कॉफी पिणं किती धोकादायक? ICMR ने धोक्यांची यादीच दिली

अनेकांना जेवणाआधी किंवा जेवणानंतर चहा पिण्याची सवय असते. पण ही सवय आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच भारतीयांसाठी 17 आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वांचा एक संच जारी केला असून यात यावर भाष्य करण्यात आलं आहे.   

शिवराज यादव | Updated: May 14, 2024, 09:14 PM IST
जेवणाआधी आणि नंतर चहा किंवा कॉफी पिणं किती धोकादायक? ICMR ने धोक्यांची यादीच दिली title=

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) अलीकडेच भारतीयांसाठी 17 आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वांचा एक संच जारी केला आहेत. यामध्ये निरोगी जीवनासोबत संतुलित आणि वैविध्यपूर्ण आहारासंबंधी सांगण्यात आलं आहे. यामधील एका गाईडलाइनमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या (NIN) रिसर्च विंगच्या वैद्यकीय पॅनेलने चहा आणि कॉफीचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे असं स्पष्ट केलं आहे. 

भारतातील अनेक लोक गरम पेय म्हणून चहा किंवा कॉफीचं सेवन करण्यास पसंती देतात. दरम्यान आयसीएमआरने लोकांना जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर चहा, कॉफीचं सेवन करण्यासंदर्भात चेतावणी दिली. "चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असते, जे मध्यवर्ती मज्जासंस्थेला उत्तेजित करते आणि शारीरिक अवलंबित्व प्रवृत्त करतं," असं ICMR च्या संशोधकांनी सांगितलं आहे.

ICMR ने लोकांना चहा किंवा कॉफीचं सेवन पूर्णपणे बंद करण्यास सांगितलेलं नाही. मात्र या पेयांमध्ये असणाऱ्या कॅफीनपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. एक कप कॉफीमध्ये (150ml) 80-120mg कॅफिन असते, इन्स्टंट कॉफीमध्ये 50-65mg असते आणि चहामध्ये 30-65mg कॅफिन असते.

"चहा आणि कॉफीचं अतिसेवन न कऱण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून कॅफिनचे सेवन सहन करण्यायोग्य मर्यादेपेक्षा (300mg/day) जास्त होऊ नये ," असं सांगण्यात आलं आहे. प्रत्येक व्यक्तीने किती कॅफीनचं सेवन करावं याची मर्यादा ठरवायला हवी असा सल्ला देण्यात आला आहे. 

जेवणाच्या आधी आणि नंतर एक तास आधी चहा किंवा कॉफीचं सेवन करु नये असं त्यांनी सांगितलं आहे. कारण या पेयांमध्ये टॅनिन नावाचे कंपाऊंड असते. जेव्हा ते सेवन केले जाते, तेव्हा टॅनिन शरीरात लोह शोषण्यात व्यत्यय आणू शकतात. याचा अर्थ टॅनिनमुळे तुमचे शरीर अन्नातून शोषले जाणारे लोहाचे प्रमाण कमी करू शकते.

टॅनिन पचनमार्गात लोहाला रोखून ठेवू शकतं ज्यामुळे शरीराला ते शोषून घेणे कठीण असतं. यामुळे तुम्ही खाल्लेल्या अन्नातून रक्तप्रवाहात प्रवेश करणाऱ्या लोहाचं प्रमाण कमी होते. ज्यामुळे शरीरातील लोहाची उपलब्धता कमी होते. लाल रक्तपेशींमधील प्रथिन जे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेतं ते हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोह आवश्यक आहे.

ऊर्जा उत्पादन आणि एकूण पेशींच्या कार्यासाठी देखील हे महत्त्वाचं आहे. लोहाची पातळी कमी झाल्यामुळे लोहाची कमतरता आणि ॲनिमिया सारखी परिस्थिती उद्भवू शकते.

याशिवाय, ICMR संशोधकांनी दुधाशिवाय चहा घेतल्याने आरोग्याला रक्त परिसंचरण वाढवण्यासारखे फायदे होत असल्याचं सांगितलं आहे. कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD) आणि पोटाच्या कर्करोगाचा धोका कमी होण्यातही मदत होते. दुसरीकडे, जास्त प्रमाणात कॉफीचे सेवन उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या ठोक्यांमधील अनियमिततेशी संबंधित आहे.