मधूमेहींसाठी 'गोड' बातमी ! ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणार खास यंत्र

भारताला मधूमेहाची राजधानी म्हटलं जातं. 

Updated: Jun 1, 2018, 12:05 PM IST
मधूमेहींसाठी 'गोड' बातमी ! ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणार खास यंत्र

मुंबई : भारताला मधूमेहाची राजधानी म्हटलं जातं. आज भारतामध्ये सुमारे 7 कोटी लोकं मधूमेहाचे रूग्ण आहेत.मधूमेह हा आजार सायालंट किलर आणि अनुवंशिक असल्याने त्यावर नियंत्रण मिळवणं कठीण होते. म्हणूनच एखदा मधूमेह जडला की आयुष्यभर त्यासाठी औषधं घ्यावीच लागणार हे अनेकजण मनाशी पक्क करून ठेवतात. 

मधूमेहाच्या रूग्णांसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणं. त्यासाठी रूग्ण अनेकप्रकारची औषधं, उपचार करत असतात. त्यांच्या आहारावर नियंत्रण ठेवतात. मात्र आता रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी एका खास उपकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. 

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांचा नवा शोध 

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी खास यंत्राची निर्मिती केली आहे. हे यंत्र शरीरात स्वादूपिंडाप्रमाणे काम करणार आहे. परिणामी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होणार आहे. असा दावा करण्यात आला आहे.  या यंत्रासाठी अजूनही संशोधन सुरू आहे.  

प्राण्यांवर यशस्वी प्रयोग 

मधूमेही उंदरांवर 30 दिवसांसाठी या यंत्राचा वापर करण्यात आला. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. शस्त्रक्रियेच्या मदतीने हे बायो पॅनक्रिएटीक यंत्र उंदरांच्या शरीरात बसवण्यात आले.यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत झाली. 2008 सालापासून या विषयी प्रयोग सुरू आहे. या डिव्हाईसमुळे शरीरात पेशींना नुकसान होत नसल्याचाही दावा करण्यात आला आहे. उंदरांवरील यशस्वी प्रयोगानंतर आता लवकरच मानवी शरीरात त्याचं प्रत्यारोपण आणि प्रयोगाविषयी चाचणी घेण्यात येणार आहे.