मुंबई : शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण होण्याचं प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक असते. मासिकपाळीचा त्रास, प्रसुतीदरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्यास स्त्रियांच्या शरीरात रक्ताची, आयर्नची कमतरता जाणवते. त्याचा परिणाम हिमोग्लोबिनच्या पातळीवरही होतो. अशावेळेस औषधोपचारासोबतच आहाराच्या पथ्यपाण्यामध्ये काही बदल केल्यास तुम्हाला हिमोग्लोबिन आणि रक्ताची पातळी वाढायला मदत होते.
शरीरात हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अनेक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे शरीरात योग्य रक्त पुरवठा होणं गरजेचं आहे. महिलांमध्ये हिमोग्लोबीनचं प्रमाण कमी असणं ही अत्यंत धोकादायक आहे. म्हणून योग्य आहार घेणं तितकचं महत्त्वाचं आहे.
एनीमीया
एनीमीया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता. शरीरातील पेशींना सक्रिय राहण्यासाठी ऑक्सिजन आणि रक्ताची आवश्यकता असते. ऑक्सिजन आणि रक्त शरीराच्या अवयवांपर्यंत पोहोचवण्याचे काम हिमोग्लोबिनचे असते.
गर्भवती महिलांसाठी हानिकारक
गर्भवती महिलांमध्ये हिमोग्लोबिन घटकांचा अभाव शारीरिक दुर्बलता वाढवते. त्याचप्रमाणे याचा बाळावरही वाईट परिणाम होतो.
ब्लड प्रेशरची समस्या
हिमोग्लोबिन जर शरीरात कमी असेल तर रक्ताचे प्रमाण कमी होतं आणि आजाराचे धोके निर्माण होतात. यासाठी रोजच्या आहारात बदल करणं गरजेचं आहे.
शरीरात हिमोग्लाबिनची कमतरता असल्यास आहारात केवळ आयर्नयुक्त पदार्थांचा समावेश करणे पुरेसे नाही. आहारातील आयर्न घटक रक्तामध्ये शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांचा समावेश करणं अत्यावश्यक आहे. याकरिता किवी, पपई, संत्र, स्ट्रॉबेरी, लिंबू, पेरू अशा पदार्थांचा मुबलक समावेश करणं आवश्यक आहे.