Measles Outbreak : गोवरच्या (Measles) साथीचा सर्वसाधारण ट्रान्समिशन काळ हा नोव्हेंबर ते मार्च असा आहे. त्यामुळे राज्यात गोवरचा उद्रेक आणखी वाढू शकतो, म्हणूनच नागरिकांनी तात्काळ आपल्या बाळाला गोवरची लस (Measles vaccine) द्यावी, असं आवाहन करण्यात येतंय. राज्यात गोवरने आतापर्यंत 12हून अधिक बालकांचा मृत्यू झालाय. विशेषत: शहरातील झोपडपट्टी भागातून गोवरचा उद्रेक (Measles Outbreak) होताना दिसतोय कारण तिथे लसीकरणच झालेलं नाही.
दरम्यान यासंदर्भात राज्याच्या साथरोग नियंत्रण कक्षप्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं की, "सध्या राज्यात शहरी भागांमध्ये गोवरचे रूग्ण आढळून येतायत. यामध्ये मुंबईतील गोवंडी आणि कुर्ल्यातील काही भाग, ठाणे शहर, भिवंडी, पनवेल, वसई-विरार आणि मालेगाव या शहरी भागात गोवरचा उद्रेक दिसून येतोय. गोवर हा विषाणूमुळे पसरणारा संसर्ग असला तरीही लसीकरणामुळे पूर्णपणे टाळता येऊ शकतो. 2 वर्षांच्या आतील मुलांना गोवरच्या लसीचे 2 डोस दिल्यास त्यानंतर गोवर होण्याचं प्रमाण नगण्य असतं."
डॉ. आवटे पुढे म्हणाले, "राज्यात 600 हून अधिक रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत पालकांनी मुलांच्या लसीकरणावर भर दिला पाहिजे. याच पार्श्वभूमीवर 9 महिने ते 5 वर्ष या वयोगटातील मुलांना (पूर्वी लस घेतली असेल किंवा नसेल) त्यांना अतिरीक्त लस देण्यात येणार आहे. सरकारी दवाखान्यांमध्ये ही लस उपलब्ध आहे. त्यामुळे पालकांनी तसंच डॉक्टरांनी लोकांना ही लस घेण्याबाबत माहिती दिली पाहिजे. लसीकरणाचा टक्का वाढला तर गोवर आटोक्यात आणण्यात मदत होईल."
नोव्हेंबर ते मार्च हा गोवरचा ट्रान्समिशन काळ आहे. या काळात तो जास्त वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या 4 महिन्यांत आपल्याला अधिक काळजी घ्यायची असल्याचंही, डॉ. आवटे यांनी सांगितलंय.
नुकतंच जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीप्रमाणे, जगभरातील जवळपास 4 कोटी मुलांनी गोवरचा डोस चुकवला असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. या आकडेवारीनुसार जवळपास 2.5 कोटी मुलांना गोवर लसीचा पहिला डोस अजून मिळू शकलेला नाहीये. तर दुसरीकजे 1.5 कोटी मुलांना गोवरच्या लसीचा दुसरा डोस मिळालेला नाहीये.
2021 मध्ये गोवरची जवळपास 90 लाख प्रकरणे नोंदवण्यात आली होती. यामध्ये 1 लाख 28 हजार मृत्यूची नोंद करण्यात आली. माहितनुसार, 22 देशांमध्ये या आजाराचा प्रभाव पहायला मिळाला. कोरोनाच्या लसीकरणामुळे गोवरच्या लसीकरणावर परिणाम झाला आणि 2022 पर्यंत जगातील अनेक भागांमध्ये गोवरचा उद्रेक झाल्याचं समोर आलंय.