नव्या व्हेरियंटनं वाढली भारताची चिंता, रूग्णसंख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन ?

कोरोनाचं संकट भारताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे, अशात तज्ज्ञांनी काय सल्ला दिला आहे पाहा

Updated: Mar 20, 2022, 06:57 PM IST
नव्या व्हेरियंटनं वाढली भारताची चिंता, रूग्णसंख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन ? title=

Corona Fourth Wave : कोरोना (Corona) संपलाय असं वाटत असतानाच चीननं (China) साऱ्या जगाची चिंता वाढवली आहे. चीन आणि हाँगकाँगमध्ये (Hongkong) दैनंदिन कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होतेय. ब्रिटनमध्येही हीच स्थिती आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरताच बहुतांश देशांनी निर्बंध हटवले. काही देशांनी मास्कमुक्ती केलीय. या सर्वांचे परिणाम म्हणूनच पुन्हा एकदा कोरोना संक्रमण वाढत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. स्वाभाविकच भारतातही रूग्णसंख्या वाढल्यास लॉकडाऊन लागणार का ? असा सवाल उपस्थित होतोय. 

लॉकडाऊन भारताला परवडणारा नाही आणि गरजही नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तिसरा डोस किंवा दरवर्षी बुस्टर डोस घेणं गरजेचं आहे, तसंच सहव्याधी असलेल्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी असं आवानही तज्ज्ञांनी केलं आहे.

चीन आणि हाँगकाँगमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं धुमाकूळ घातलाय. त्यामुळे चीनच्या बहुतांश शहरात लॉकडाऊन लावण्यात आलाय. येत्या काळातील धोका लक्षात घेऊन भारताची केंद्रीय यंत्रणा अॅक्शन मोडवर आलीय. 

अलिकडेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनाचं जिनोम सिक्वेंसिंग आणि कोरोना टेस्टची संख्या वाढवण्याचे आदेश देण्यात आलेत. याशिवाय राज्यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाचे नियम पाळते जातायेत की नाही यावर राज्यांनी लक्ष द्यावं असंही सांगण्यात आलंय. 

भारतात जूनमध्ये कोरोनाची चौथी लाट येऊ शकते असा अंदाज IIT कानपूरच्या तज्ज्ञांनी वर्तवला आहे. नवा व्हेरियंट किती घातक असेल हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र लॉकडाऊन टाळायचा असेल तर प्रत्येकानं सतर्कता बाळगायला हवी. कारण कोरोनारूपी संकट भारताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय.