बैठ्या जीवनशैलीमुळे पचनविकाराची समस्या जाणवतेय ? जाणून घ्या उपाय

छातीत जळजळ, आंबटपणा, गॅस्ट्रोएफॅगेअल रिफ्लक्स अशा प्रकारच्या पचनासंबंधी समस्या 

Updated: Apr 25, 2020, 01:28 PM IST
बैठ्या जीवनशैलीमुळे पचनविकाराची समस्या जाणवतेय ? जाणून घ्या उपाय

मुंबई : कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी लोकांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत अनेकांना छातीत जळजळ, आंबटपणा, गॅस्ट्रोएफॅगेअल रिफ्लक्स अशा प्रकारच्या पचनासंबंधी समस्या उद्भवू शकतात असे झेन मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पीटलचे पोटविकार तज्ञ डॉ. रॉय पाटणकर यांनी सांगितले.

एसिड रिफ्लेक्स : काही खाल्यानंतर छातीत जळजळ होत असेल तर ही अॅसिड रिफ्लेक्सची समस्या आहे. अन्नाचा घास गिळल्यावर तो अन्ननलिकेतून जठराकडे जातो. अन्ननलिका जठराला जिथे मिळते, तिथे एक वर्तुळाकार झडप असते. अन्न जठरात पोचल्यावर ही झडप पूर्णपणे बंद होते. पण काही व्यक्तींमध्ये ही झडप थोडी सैल पडते आणि जठरातले आम्ल अन्ननलिकेत जाते आणि छातीत जळजळ होऊ लागते. हार्ट बर्न तसेच अॅसिड रिफ्लेक्सच्या लक्षणे म्हणजे ओटीपोटात दुखणे, घसा खवखवणे, पोटात गोळा येणे, पोट खराब होणे, मळमळ होणे, गिळण्यास अडचणी येणे.

(जीईआरडी) - खाल्लेले अन्‍न पचवण्यासाठी आपल्या पोटाच्या आतल्याभागामध्ये अनेक पाचक द्रव्ये बनवली जातात. यामधीलच एक म्हणजे पोटातील आम्ल होय. काही व्यक्तींमध्ये लोवर इसोफँगियल स्पिंक्टर (एल.ई.एस.) नीट बंद होत नाही. यामुळे पोटातील आम्ल जास्त प्रमाणात स्रवतो आणि पुन्हा इसोफंगसमध्ये जातो. त्यामुळे छातीत दुखणे, जळजळणे यासारखे समस्या उद्भवतात. यालाच ‘जीईआरडी’ म्हणतात. हार्ट बर्न हे ‘जीईआरडी’चे सामान्य लक्षण आहे. यामुळ एखाद्याला अन्न गिळण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, घश्यात खवखवणे, तीव्र खोकला, झोप न येणे, आंबट ढेकर येणे आणि छातीत जळजळ होणे यासारख्या लक्षणे दिसून येतात. लॉकडाऊनच्या कालावधीत लोक घरी असल्याने जेव्हा त्यांच्या खाण्याच्या सवयी किंवा झोपेचे वेळापत्रक बदलल्याने देखील अशा समस्या निर्माण होतात.

अतिसार - जुलाब अथवा अतिसार ही एक पोटाची भयंकर समस्या आहे. पोटात इनफेक्शन झाल्यामुळे जुलाब होऊ लागतात. या समस्येमध्ये मळ पातळ होतो आणि रूग्णाला पाण्यासारखे जुलाब होतात. वारंवार जुलाब झाल्यामुळे रूग्णाच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. ज्यामुळे अशक्तपणा येऊन रुग्णाला चक्कर, मळमळ होऊ लागते. यामध्ये ओटीपोटात वेदना, सतत वॉशरूमला जावे लागणे, उलट्या होणे आणि थकवा येणे ही लक्षणे आहेत.

बद्धकोष्ठता : आपण सेवन केलेल्या आहाराचे व्यवस्थितरीत्या पचन न होणे किंवा चुकीच्या पध्दतीने आहार घेणे, बैठे काम, व्यायामाचा अभाव, अवेळी खाणे, अवेळी झोपणे इत्यादी अनेक कारणांमुळे बध्दकोष्ठतेची समस्या जाणवते. शौचास न होणे, मल अतिशय कडक असणे व तो बाहेर पडण्याकरिता त्रास होणे ही लक्षणे पहायला मिळतात. अशा वेळी आतडे स्वच्छ न झाल्याने पोटात गॅसेसची समस्या होऊ शकते.

मूळव्याध : आपण मूळव्याध ग्रस्त आहे? रक्तवाहिन्यांना आलेली सूज आणि त्यामुळे तयार होणारा फुगवटा यालाच मूळव्याध अथवा पाइल्स म्हटलं जातं. रक्तवाहिन्यांवर ताण आल्याने काही वेळेस रक्तस्राव देखील होतो.

पचनासंबंधी समस्या टाळण्यासाठी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

• कशाने तुम्हाला पोटाच्या तक्रारी उद्भवतात याची नोंद करून ठेवा. अमूक अमूक गोष्टींचे सेवन केल्याने पचनसंस्थेच्या कार्यात अडथळे येत असल्यास, त्रास होत असल्यास त्या पदार्थांचे सेवन करणे टाळा. अशा पदार्थांची विशेष नोंद करून ठेवल्याने पुढच्या वेळी अशा समस्या उद्भवणार नाहीत.
• समतोल आहाराचे सेवन करा. मेदयुक्त पदार्थ, तेलकट, खारट, जंक फुडचे सेवन करणे टाळा. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि स्वतःच्या मनाने औषधोपचार करणे टाळा. आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश करा. खाण्या-पिण्याच्या चांगल्या सवयी लावून घ्या
• गरजेपेक्षा जास्त आहाराचे सेवन करणे टाळा. एकाच वेळी भरपेट न जेवता. ठराविक अंतराने थोडे थोडे खाण्याची सवय लावून घ्या.
• मद्यपान तसेच धूम्रपान करणे टाळा. वजन अटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करा. कांद्याचा रस किंवा टोमॅटोच्या रसाचे सेवन करू नका तसेच कच्चा कांदा देखील खाऊ नका.
• साखर, हवाबंद डब्यातील पदार्थ, मसालेदार पदार्थ खाऊ नका. रात्री उशिरा खाणे टाळा तसेच जेवणाच्या वेळेचे पालन करा. भरपूर पाणी प्या. दररोज घरच्या घरी व्यायाम करा.
• स्वच्छतेवर भर द्या. वॉशरुमचा वापर केल्यानंतर स्वच्छ हात धुवा. यामुळे खालाच्या अतिसारासारख्या आजारापासूनही दूर राहता येईल.
• तणावापासून दुर राहणे उत्तम. कारण मानसिक तणाव हा पचनक्रियेवर वाईट परिणाम करतो.