धक्कादायक! सतत डोळे चोळण्याच्या सवयीमुळे 21 वर्षीय तरुणाने दृष्टी गमावली; थेट रुग्णालयात..

Continuous Eye Rubbing Lost Vision: या तरुणाने सोशल मीडियावरुन त्याच्याबरोबर घडलेल्या या विचित्र प्रकाराची माहिती दिली आहे. त्याने नेमका हा सारा प्रकार कसा घडला आणि काय काय झालं हे व्हिडीओत सांगितलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 28, 2024, 08:53 AM IST
धक्कादायक! सतत डोळे चोळण्याच्या सवयीमुळे 21 वर्षीय तरुणाने दृष्टी गमावली; थेट रुग्णालयात.. title=
या तरुणानेच सांगितला घटनाक्रम (प्रातिनिधिक फोटो)

Continuous Eye Rubbing Lost Vision:  डोळ्यात काही गेलं तर आपल्यापैकी अनेकजण डोळे चोळतात. अगदी सहज चेहऱ्यावरुन हात फिरवतानाही आपण डोळे चोळतो. कधीतरी तर बराच वेळ काहीजण डोळे चोळताना दिसतात. अर्थात डोळे चोळल्याने तात्पुरता आराम आणि खाज येत असेल तर त्यापासून सुटका होते. मात्र डोळे चोळण्याचे दिर्घकालीन दुष्परिणाम फार गंभीर आहेत. मलेशियामधील एका 21 वर्षीय तरुणाबरोबर हेच घडलं. या तरुणाला वारंवार आपले डोळे चोळण्याची सवय होती. त्याच्या या सवयीमुळे त्याच्या डोळ्यातील दृष्टीपटलाला इजा झाली आणि त्याला शस्रक्रीया करुन दृष्टीपटल बददलावे लागले.

नक्की कोणाबरोबर घडला हा प्रकार?

ज्या तरुणाबरोबर हा दुर्देवी प्रकार घडला त्याचं नाव मोहम्मद झाबीदी असं आहे. लहानपणापासूनच झाबीदीला अनेक गोष्टींची अॅलर्जी होती. अनेकदा तो त्याचे डोळे अगदी लाल पडेपर्यंत चोळायचा. मात्र यामधूनच पुढे त्याच्या डोळ्यांच्या प्रकृतीसंदर्भात समस्या निर्माण झाल्या. 15 वर्षांचा असताना झाबीदीला उजव्या डोळ्याने आपल्याला कमी दिसत असल्याचं जाणवू लागलं. जसजसा तो मोठा होत गेला तशीतशी त्याच्या उजव्या डोळ्याची दृष्टी कमकुवत होत गेली. 

स्वत: दिली यासंदर्भातील माहिती

डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर असं लक्षात आलं की सातत्याने डोळा चोळल्याने डोळ्यातील दृष्टीपटलला इजा झाली आहे. दृष्टी पूर्वव्रत होण्यासाठी झाबीदीला रेटीना ट्रान्सप्लांट म्हणजेच दृष्टीपटल बदलण्याची शस्त्रक्रीया करावी लागली. झाबीदीनेच टीकटॉकवरुन या समस्येसंदर्भातील माहिती दिली आहे. वय वाढत गेलं त्याप्रमाणे दृष्टी कमी कमी होत गेली. दृष्टीपटलाला तडा गेल्याने वयाच्या 21 व्या वर्षापर्यंत मला उजव्या डोळ्यानं दिसणं बंद झालं असं झाबीदीने म्हटलं आहे. 

काही दिवस डोळा बंदच ठेवावा लागणार

झाबीदीवर करण्यात आलेली रेटीना रिप्लेसमेंटची शस्त्रक्रीया यशस्वी झाली आहे. झाबीदीच्या डोळ्यातील तडा गेलेलं दृष्टीपटल काढून त्या जागी नवीन दृष्टीपटल लावण्यात आलं आहे. आता आपली प्रकृती ठीक असल्याचं झाबीदीने सांगितलं असून सध्या काही दिवस उजवा डोळा पूर्णपणे बंदच ठेवावा लागणार असल्याचंही तो म्हणाला. डोळे चोळल्याने डोळ्यांना तात्पुरता आराम मिळत असला तरी दिर्घकालीन दृष्परिणाम अधिक गंभीर आहेत.

डोळे का चोळू नयेत याची पाच कारणं खालीलप्रमाणे : 

> सतत डोळे चोळल्याने डोळ्यांची जळजळ होणे, डोळे दुखावणे अशा समस्या निर्माण होतात.

> सतत डोळे चोळल्याने बॅक्टेरिया आणि विषाणूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते.

> डोळ्यात ओलावा टीकवणाऱ्या स्नायूंना इजा होऊन गंभीर परिणाम होऊ शकतात.

> डोळ्यात रक्त साकाळून डोळे लाल पडू शकतात.

> डोळ्यांना कायमची इजा होऊन दृष्टी गमावण्याची शक्यता निर्माण होते.