मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसते. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 1357 नवे रुग्ण आढळले आहेत. तर यापैकी केवळ मुंबईत 889 रुग्ण आढळले असून एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागलाय. चार महिन्यांनंतर मुंबईत एकाच दिवसात कोरोनाचे इतके रुग्ण आढळले आहेत.
31 मे रोजी मुंबईत कोरोनाचे 506 नवीन रुग्ण आढळले. त्याच वेळी, 1 जून रोजी 739, 2 जून 704, 3 जून 763 आणि 4 जून रोजी 889 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या 28 मे रोजी ओमायक्रॉनचे सबवेरियंट बी.ए. 4 आणि B.A.5 या सब-व्हेरिएंटचे रुग्णंही आढळून आले होते. ओमायक्रॉनचे नवीन सब-व्हेरिएंट खूप वेगाने पसरत असल्याची माहिती आहे. त्यापैकी बी.ए. 4 चे चार रुग्ण आणि बी.ए. 5 पैकी 3 रुग्ण होते. अशा स्थितीत एकूण आकडा 7 वर पोहोचलाय.
यामध्ये एक दिलासादायक बाब म्हणजे कोणालाही गंभीर लक्षणं दिसून आली नाहीत. लागण झालेल्या रुग्णांपैकी दोन रुग्ण 50 वर्षांवरील, तर दोन रुग्ण 20 ते 40 वर्षे वयोगटातील असल्याची माहिती आहे. एक रुग्ण 10 वर्षांपेक्षा कमी वयाचा होता. मुलाने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते, परंतु तरीही त्याला ओमिक्रॉनच्या सब-व्हेरियंटचा संसर्ग झाला होता.
मुंबईसह राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसतेय. या आठवड्यात राज्यात हजाराहून अधिक रुग्ण आढळत आहेत. काल राज्यात 1 हजार 134 रुग्ण आढळले होते. आज त्यात आणखी वाढ झाली आहे.
आज राज्यात कोरोनाचे 1357 नविन रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.87% इतका आहे.
गेल्या चोवीस तासात राज्यात 595 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 98.5 टक्के इतकी झाली आहे. राज्यात आता 5888 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी मुंबईत सर्वाधिक 4294 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर त्या खालोखाल ठाणे जिल्ह्यात 769 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.