कोरोनानंतर मुंबईकरांना डेंग्यू आणि मलेरियाचा 'ताप'

डेंग्यू आणि मलेरियासारख्या गंभीर आजारांनीही डोकं वर काढलंय.

Updated: Sep 4, 2021, 12:52 PM IST
कोरोनानंतर मुंबईकरांना डेंग्यू आणि मलेरियाचा 'ताप' title=

मुंबई : मुंबईकरांना एकीकडे कोरोनाच्या संकटाला सामोरं जावं लागतंय तर दुसरीकडे डेंग्यू आणि मलेरियासारख्या गंभीर आजारांनीही डोकं वर काढलंय. मुंबईमध्ये आता डेंग्यू आणि मलेरियाची या आजारांची साथ आली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये एकंदरीत साथीच्या आजारांचा धोका वाढलेला दिसून आला आहे.

ऑगस्ट महिन्यात शहर उपनगरांत मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण वाढल्याचे दिसून आल्याची नोंद करण्यात आली आहे. केवळ ऑगस्ट महिन्यात 790 मलेरियाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर, डेंग्यूचे 132 रुग्ण सापडले असून आतापर्यंत एकूण 209 रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान जानेवारी ते ऑगस्टपर्यंत मलेरियाच्या 338 रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर आता साथीच्या आजारांचा धोका वाढत आहे. बदलतं वातावरण आणि पाऊस या आजारांसाठी पोषक ठरत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी योग्य खबरदारी घेऊन वेळीच वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

यानंतर आठ महिन्यांमध्ये 1848 गॅस्ट्रो रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे लेप्टोस्पायरोसिसचे 133 रूग्ण, डेंग्यूचे 209 रूग्ण असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. तर काविळीचे 165 तसंच स्वाइन फ्लू आजाराचे 45 रूग्ण गेल्या आठ महिन्यांत आढळले आहेत. डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण डोंगरी(बी), परळ(एफ साऊथ) आणि वांद्रे पश्चिम(एच पश्चिम) या भागांत आढळले आहेत.