मुंबई : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. दरम्यान मुंबई महापालिका, या लसीकरण मोहीमेला वेग मिळावा यासाठी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. यानुसार मुंबईत रात्री 10 वाजेपर्यंत लसीकरण सुरू ठेवण्याचा महापालिकेचा विचार आहे.
सध्या मुंबईमध्ये 9 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये नागरिकांचं लसीकरण केलं जातं. तर हीच लसीकरणाची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत करण्याचा विचार आहे. मुख्य म्हणजे लसीचा दुसरा डोस टाळणाऱ्यांचं लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात येतोय. या माध्यमातून अशा नागरिकांना हेरून लसीकरण केलं जाईल. मुंबईत उशिरा कामावरून येणा-यांच्या सोयीसाठी ही वेळ वाढवण्याचा विचार आहे.
लसीकरणाची आकडेवारी पाहिली तर मुंबईत आतापर्यंत एक कोटी 70 लाख 53 हजारांपेक्षा अधिक नागरिकांचं लसीकरण पूर्ण झाल्याची नोंद आहे. यामध्ये 97 लाखांपेक्षा अधिकांनी लसीचा पहिला डोस घेतलाय. तर 73 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याची माहिती आहे. नागरिकांनी अधिकाअधिक प्रमाणात लसीच्या दुसऱ्या डोससाठी पुढाकार घ्यावा यासाठी मुंबई महापालिका हा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये 187 कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली करण्यात आली आहे. तर यामध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील चाचण्यांची संख्या वाढवलेली असली तरी दर दिवसा रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय.
दुसरीकडे राज्यात ओमायक्रॉन कोरोना व्हेरिएंटने शिरकाव केला असून कोरोना रुग्णवाढ आटोक्यात असल्याचं दिलासादायक चित्र आहे. रविवारी दिवसभरात 704 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 699 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 18 पैकी 9 ओमायक्रॉन रुग्णांनाही डिस्चार्ज मिळालाय.