Bihar Crime News : एखादे व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याच्या मृत आत्म्याला शांती लाभावी या धार्मिक भावनेतून तेरवीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावेळी, मृत व्यक्तीचे स्मरण करुन भोजनदान देखील केले जाते. यामुळे या जेवणात काही कमी जास्त झाले तरी कुणी तक्रार करत नाही. बिहारमध्ये (Bihar) मात्र, तेरवीच्या जेवणात दही संपल्यावरुन तुफान राडा झाला. यावरुन संतप्त झालेल्यांनी थेट गरम जेवण मृत व्यक्तीच्या कुटुंबियांवर फेकले. यात दहा जण जखमी झाले आहेत (Bihar Crime News).
बिहारच्या बेगुसरायमध्येही धक्कादायक घटना घडली आहे. खोदवंदपूर पोलीस स्टेशन हद्दीतील मासराज गावात हा तेरवीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. लल्लू कुमार साह यांच्या काकूंचे निधन झाले होते. यानंतर त्यांच्या तेरवीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. संपूर्ण गावाला याचे निमंत्रण देण्यात आले होते.
लल्लू कुमार साह यांच्या घराबाहेर जेवणाच्या पंगती बसल्या होत्या. यावेळी कृष्णकुमार नावाच्या तरुणाच्या ताटातील दही संपले. त्याने लल्लू कुमार यांच्या घरातील जेवण वाढणाऱ्या सदस्याला दही आणण्यास सांगितले. त्याने दही आणले नाही. सर्व वाडपींना त्याने ताटातील दही संपले असल्याचे सांगितले. मात्र, कुणीच त्याला दही आणून दिले आहे.
वारंवार दही आणा असे सांगून कुणीही दही आणून न दिल्याने कृष्णकुमार भयंकर चिडला. त्याने लल्लू कुमार साह यांच्यासह जेवण वाढणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कृष्णकुमार एवढ्यावरच थांबला नाही. त्याने गरम जेवण लल्लू कुमार यांच्या कुटुंबातील सदस्यांवर फेकले.
या घटनेत लल्लू कुमार यांच्या कुटुंबातील जवळपास दहा जखमी झाले आहेत. यापैकी पाच जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कृष्णकुमार कारवाई करावी अशी मागणी लल्लू कुमार साह यांच्या कुटुंबियांनी केली आहे.