जम्मू-काश्मिरमध्ये गाडी दरीत कोसळल्याने 11 जण ठार

गाडीत क्षमतेपेक्षा अधिक जण बसल्याने हा अपघात झाला आहे. 

Updated: Mar 16, 2019, 08:19 PM IST
जम्मू-काश्मिरमध्ये गाडी दरीत कोसळल्याने 11 जण ठार title=

श्रीनगर : जम्मू काश्मिरमधील रामबन जिल्ह्यात शनिवारी एसयुवी गाडी 500 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये  4 महिला आणि 5 मुलांचा समावेश आहे. शनिवारी सकाळी 10.30 च्या दरम्यान हा अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कुंड नाला नजीक एसयुवी गाडी 500 फूट खोल दरीत कोसळली आहे. अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. एसयुवी गाडीमधून 15 जण प्रवास करत होते. ही गाडी चंद्रकोटहून राजगडच्या दिशेने जात होती. 

स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी मदत कार्याला सुरुवात केली आणि घटनास्थळावरुन मृतदेहांना आणि जखमींना बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाडीतील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. इतर पाच जणांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाताना मृत्यू झाला. तसेच चालकासोबत इतर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना पुढील उपचारासाठी जम्मूमध्ये हलवण्यात आले आहे.

गाडीत क्षमतेपेक्षा अधिक जण बसल्याने हा अपघात झाला आहे. दरीच्या भागामध्ये चालवल्या जाणाऱ्या एसयुवी गाड्यांमध्ये कमाल सात लोकांची क्षमता आहे. परंतू या नियमांचे उल्लघंन केले. मदत कार्यादरम्यान मिळालेल्या मृतदेहांची ओळख पटलेली आहे. मृतांमध्ये मोहम्मद  मुबीन  (23 वर्ष) , रोमल दीन (61 वर्ष), रुबीना बेगम (30 वर्ष), उर्मिला देवी (32 वर्ष), बबली देवी (37 वर्ष), इमानो बानो (13 वर्ष), अर्जून (9 वर्ष), परी (2 वर्ष) आणि तीन महिन्याच्या एका चिमुरड्याचा समावेश आहे.

या अपघातात जखमी झालेल्या एका मुलाला उपचारासाठी वैद्यकीय रुग्णालयात  नेण्यात येत होते. त्यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सोबतच एका मुलाची आणि महिलेची ओळख पटवण्यासाठी शोध घेतला जात  असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.