भिवानी : देशभरात थंडीची लाट पसरली असून धुक्याचे प्रमाणही वाढत आहे.
काहीच दिवसांपुर्वी राजधानी दिल्लीत दाट धुक्यामुळे एक जबरदस्त अपघात झाला. तर याच हरियाणामध्ये याच धुक्याने अजून एक बळी घेतला आहे. हरियाणातील चरखी दादरी जिल्हात ही दुर्घटना झाली. दाट धुक्यामुळे समोरचे काही दिसत नव्हते. यामुळे स्कूल बस आणि ट्रॅकमध्ये जबरदस्त टक्कर झाली. यात १९ जण जखमी झाले तर एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. जखमींमध्ये दोन शिक्षकांचा समावेश आहे. जखमींना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कूल बसमध्ये मंडोली येथील सरस्वती स्कूलमधील ७० मुले आणि २ शिक्षक होते. दाट धुक्यामुळे स्कूल बसची गती मंद होती. पण समोरून वेगाने आलेल्या ट्रॅकने बसला जोरात टक्कर मारली.
त्यामुळे बसमधील १८ विद्यार्थ्यी आणि २ शिक्षक जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यापैकी गंभीर जखमी झालेल्या ५ विद्यार्थ्यांना लगेचच रूग्णालयात दाखल करून घेण्यात आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीजीआई रुग्णालयातील डॉक्टरांनी ५ विद्यार्थ्यांनापैकी पाच वर्षीय आरूषला मृत घोषित केले. तर अन्या चौघांवर उपचार सुरू आहेत.