पाक सैन्याकडून प्रशिक्षण आणि पैशाचं आमिष! उरीत पडकलेल्या दहशतवाद्याचा धक्कादायक खुलासा

अवघ्या 50 हजार रुपयांसाठी 19 वर्षांचा पाकिस्तानी तरुण दहशतवादी बनला

Updated: Sep 29, 2021, 04:44 PM IST
पाक सैन्याकडून प्रशिक्षण आणि पैशाचं आमिष! उरीत पडकलेल्या दहशतवाद्याचा धक्कादायक खुलासा  title=

नवी दिल्ली : पाकिस्तान लष्कर, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba) काश्मीरमध्ये जिहादच्या नावाखाली दहशतीचं जाळं विणत आहे. असहाय आणि गरीब तरुणांना हेरून दहशतवादी संघटना त्यांच्यांकडून दहशतवादी कारवाया करुन घेत आहे. लष्करचा पाकिस्तानी दहशतवादी अली बाबरने (Ali Babar Patra) हा खुलासा केला आहे. उत्तर काश्मीरच्या बारामुल्लाच्या सीमा जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये (Uri sector of Jammu and Kashmir) अली बाबरला जिवंत पकडण्यात आलं होतं, त्यानंतर त्याने भारतीय सुरक्षारक्षकांकडे पाकिस्तानची पोलखोल केली आहे. 

गरिबीमुळे आपली दिशाभूल झाल्याचं अली बाबरने सांगितले. त्याला लष्कर-ए-तोयबामध्ये सामील होण्याचं आमिष दाखवण्यात आलं. आईच्या उपचारासाठी दहशतवाद्यांनी त्याला 20 हजार रुपये दिले. तसंच 30 हजार रुपये आणखी देण्याचं आश्वासनही देण्यात आलं. शस्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण ज्यांनी दिलं, त्यापैकी बहुतेक पाकिस्तानी लष्कराचे जवान होते, असा खुलासाही अली बाबरने केला आहे. 

इस्लामच्या नावाखाली तरुणांना चिथवलं जातं, तसंच दहशतवादी बनण्यास भाग पाडलं जातं, वडिलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबाची हलाखीची परिस्थिती झाली , घरात विधवान आई आणि बहिणीची जबाबदारी होती. गरीबीमुळे आपली दिशाभूल केली गेली आणि लष्कर-ए-तोयबामध्ये सामील होण्याचं आमिष दाखवण्यात आलं, असं अली बाबर यानं म्हटलं आहे. आर्थिक परिस्थितीमुळे अली बाबरने सातवीनंतर शासकीय शाळा सोडली. 

पाकिस्तान सैन्याने दिलं प्रशिक्षण

फेब्रुवारी 2019 मध्ये अली बाबरला पाकिस्तानी सैन्याच्या गडी हबीबुल्लाह मुझफ्फराबाद इथल्या खैबर कॅम्पमध्ये तीन आठवड्यांचं प्रशिक्षण देण्यात आलं. या दरम्यान, त्याच्यासोबत एकूण 9 पाकिस्तानी मुलं होती. काश्मीरमध्ये जिहादसाठी या सर्व तरुणांना तयार करण्यात येत होतं. पाकिस्तानी सैन्याच्या एका सुभेदाराने लष्करी प्रशिक्षण दिलं. शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण पाकिस्तानी सैन्याच्या जवानांकडून दिलं जातं. त्यानंतर 2021 मध्ये रिफ्रेशर ट्रेनिंग कोर्स घेण्यात आला अशी माहिती अली बाबरने दिली आहे.

नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा डाव

18 सप्टेंबरला अली बाबरने पाच साथीदारांसह नियंत्रण रेषेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैन्याने घुसखोरांवर गोळीबार केला. यावेळी चार साथीदार पुन्हा पाकिस्तानच्या दिशेने पळाले, तर आपण आणि आणखी एका साथीदाराने नाल्यात उडी मारली. आपल्याबरोबर असणाऱ्या साथीदाराने भारतीय सैन्यावर गोळीबार केला. प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने केलेल्या गोळीबारात साथीदार मारला गेला, त्यामुळे आपण प्रचंड घाबरलो आणि मला मारू नका अशी विनंती भारतीय सैनिकांना केली. 

भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण

बाबरने सांगितले की 26 सप्टेंबरला सकाळी भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केलं. लष्कराने माझ्याशी कोणतीही चुकीची वागणूक किंवा अत्याचार केला नाही असं सांगत अली बाबरने पाक लष्कर, ISI आणि लष्करला निष्पाप मुलांना जिहादसाठी भडकवू नका असं सुनावलं. इस्लाम धोक्यात आहे आणि काश्मीरमधील मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत अशी खोटी भाषणं दिली जातात, असं बाबरने सांगितलं. तसंच भारतीय सैन्य जेव्हा आपल्याला उरीला घेऊन आले तेव्हा सर्व काश्मिरी खुश असल्याचं आपण पाहिलं. पण आम्हाला काश्मिर नागरिकांवर अत्याचार होत असल्याचं भासवण्यात आलं असंही अली बाबर यानं म्हटलं आहे. 

काश्मिरमधल्या तरुणांची दिशाभूल

बाबर आणि त्याच्या गटाला काश्मीरमध्ये प्रवेश करणं आणि पट्टण भागात राहण्याचे आदेश देण्यात आले होते. तिथे लष्कर हँडलर आमच्याशी संपर्क साधेल आणि भविष्यातील योजनांबद्दल सूचना देईल असं सांगण्यात आलं होतं. काश्मिर खोऱ्यातील तरुणांची दिशाभूल करुन कटात सहभागी करुन घेण्याचं काम आमच्यावर सोपवण्यात आलं होतं, अशी माहितीही अली बाबरने दिली.