कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : भारतात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. फेसबुकवर आपण आपली मतं मांडतो, आपल्या वैयक्तिक आयुष्यातील चांगले वाईट क्षण शेअर करतो. फेसबुक अकाऊंट सुरू करताना आपण फेसबुकवर गरजेचं आहे म्हणून आपली वैयक्तिक माहितीही टाकत असतो. त्यामुळं फेसबुक म्हणजे आपल्या वैयक्तिक माहितीचा खजिना झाला आहे. साहजिकच फेसबुकच्या सुरक्षिततेविषयीचा प्रश्न समोर येतो. गेल्या काही महिन्यातल्या घटना पाहता फेसबुकवरील तुमची वैयक्तिक माहिती असुरक्षित झाली आहे.
नुकताच फेसबुकवरच्या २६ कोटी युजर्सची माहिती फुटल्याचा दावा सायबर सुरक्षा क्षेत्रातील कम्पेरिटेक आणि बॉब डायाचेन्को या कंपन्यांनी केला आहे. या कंपन्यांच्या दाव्यानुसार फेसबुकच्या एपीआयचा गैरवापर करुन युजर्सची खासगी माहिती गोळा करण्यात आली. ही माहिती ऑनलाईन असुरक्षित डाटाबेसमध्ये टाकण्यात आली. युजर्सचे आयडी, फोन नंबर आणि पूर्ण नाव या डाटाबेसमध्ये आहे.
फेसबुक सुरक्षित असल्याचा वेळोवेळी दावा करण्यात आला. पण हा दावा त्या त्या वेळी खोटा निघाला. त्यामुळं आता फेसबुक युजर्सनं त्यांची वैयक्तिक माहिती फेसबुकवर देणं टाळलं पाहिजे असं सायबरतज्ज्ञ सांगतात.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची खासगी माहिती फोडण्यासाठी काही वेळा हॅकर्स तुम्हाला बोगस अकाऊंटवरुन फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. त्यामुळं कोणतीही अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारु नका.
फेसबुकचा वापर करा, पण थोडं सावध राहून, बेसावध राहिला तर तुमच्या खासगी माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.