नवी दिल्ली : आज देशात नागरिकत्व कायद्याविरोधात (Citizenship Amendment Act) आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, हे चुकीचे आहे. गरिबांच्या झोपड्या पेटवू नका. मोदीचा पुतळा जाळायचा असेल तर जरुर जाळा. पण गरिबांना त्रास देऊ नका, त्यांच्या रिक्षा जाळू नका, असे आवाहन करताना CAA हा कायदा देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी लागू करण्यात आला आहे. हा कायदा मुस्लिम विरोधी नाही. काही राजकीय पक्ष मुस्लिमांमध्ये त्याबाबत भ्रम निर्माण करत आहेत, असा जोरदार हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केला आहे.
दिल्लीत रामलीला मैदानावर भाजपकडून ‘धन्यवाद’ रॅली आयोजित करण्यात आली आहे. यावेळी मोदींनी काँग्रेसवर चौफेर टीका केली. नागरिकत्व सुधारणा कायदा हा देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. माझा पुतळा जाळा पण संपत्तीचं नुकसान नको. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. समस्या रखडत ठेवणे आमच्या संस्कारात नाही. अर्बन नक्षली लोक याचा अपप्रचार करत आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी हे नक्की काय आहे, हे जनतेने समजून घ्यावे. युवकांनी याबाबत वाचन करावे. विरोधी प्रचाराला नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन मोदी यांनी केले.
देशातील मुस्लिमांना कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. शहरी नक्षलवादी लोकांकडून अफवा पसरविण्याचे काम सुरू आहे. भारताला जगभरात बदनाम करण्याचा डाव विरोधी पक्षांचा सुरू आहे. भाजपने देशात विकासकामे करताना जात, धर्म पाहिला नाही. दीड कोटी लोकांना घरे दिली. दिल्लीतील २००० व्हीआयपी बंगले खाली केले. पण, माझ्यासाठी तुम्हीच व्हीआयपी आहात. दिल्लीकरांना सुविधा मिळाव्यात हेच आमचे उद्दिष्टय़ आहे. यापुढे दिल्लीकरांना खोटी आश्वासने मिळणार नाहीत. आम्ही वसाहतींचे प्रश्न सोडवत आहोत. अनधिकृत वसाहतींना अधिकृत केले. आतापर्यंत दिल्लीकरांना खोटय़ा आश्वासनांना बळी पडावे लागले, ते आता होणार नाही, असे सांगत दिल्ली निवडणुकीची रणशिंग मोदींनी फुंकले.
दिल्ली राज्य सरकारने येथील जनतेची निराशा केली आहे. खोटी आश्वासने दिली आहेत. साधे पाणी मिळत नाही. जे मिळत आहे ते पिण्यायोग्य आहे का, असा सवाल करत थेट जनतेशी संवाद साधला. दिल्ली सरकारने मेट्रोच्या कामात खोडा घातला आहे. अरविंद केजरीवाल सरकारने फक्त विरोधाचेच काम केले आहे, असा थेट आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
दरम्यान, नागरिकत्व कायद्याविरोधात (CAA) आंदोलन होत आहे. ते चुकीचे आहे. देशभरातील पोलिसांचा सन्मान करा. ते कोणाचे शत्रू नसतात. संकट काळात कोणतीही जात, धर्म न पाहता ते आपल्या मदतीला धाऊन येत असतात. नागरिकत्व कायदाविरोधी आंदोलनात पोलिसांवर दगडफेक करुन काही साध्य होणार नाही. हा कायदा देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे.