काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; दोन जवान शहीद

या जखमी जवानांचा शनिवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला

Updated: May 2, 2020, 09:06 AM IST
काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; दोन जवान शहीद title=

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला परिसरात पाकिस्तानकडून शुक्रवारी दुपारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. यावेळी पाकिस्तानी लष्कराकडून करण्यात आलेल्या बेछुट गोळीबारात भारताचे दोन जवान जखमी झाले होते. या जखमी जवानांचा शनिवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आणखी एक जवान मृत्यूशी झुंज देत आहे.

'काश्मीरला मोठा धोका; पाकिस्तानकडून पाठवले जातायत कोरोनाबाधित घुसखोर'

प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सीमारेषेनजीक असलेल्या रामपूर येथे पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानी लष्कराने यावेळी अंदाधुंद गोळीबार केला. भारतीय सैन्यानेही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, यादरम्यान तीन भारतीय जवान जखमी झाले होते, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते राजेश कालिया यांनी दिली होती. यापूर्वी ३० एप्रिललाही पाकिस्तानकडून पुंछ सेक्टरमध्ये गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा करण्यात आला होता. 

संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाविरुद्ध एकत्र येऊन लढत असताना पाकिस्तान मात्र काही सुधरायला तयार नाही. पाकिस्तानच्या या कृत्यांबद्दल भारतीय लष्करप्रमुख एम.एम. नरवणे यांनी काही दिवांसपूर्वीच संताप व्यक्त केला होता. कोरोनाच्या संकटात भारत फक्त स्वत:च्याच नागरिकांची काळजी घेत नाही. तर इतर देशांमध्येही वैद्यकीय पथके आणि औषधे पाठवत आहे. याउलट पाकिस्तान अजूनही दहशतवाद पसरवण्यातच मग्न आहे. ही चांगली गोष्ट नव्हे, असे लष्करप्रमुख एम.एम. नरवणे यांनी म्हटले होते.