सुपरमार्केटमध्ये मुलीने चॉकलेटसाठी फ्रीज उघडला अन् घात झाला; खांद्यावर उचलून बापाने धाव घेतली पण अखेर...

सुपरमार्केटमध्ये फ्रिज उघडताना विजेचा धक्का लागल्याने एका 4 वर्षाच्या चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला आहे. मुलीचे आई-वडील शेजारी उभे असतानाच ही धक्कादायक घटना घडली.   

शिवराज यादव | Updated: Oct 3, 2023, 02:19 PM IST
सुपरमार्केटमध्ये मुलीने चॉकलेटसाठी फ्रीज उघडला अन् घात झाला; खांद्यावर उचलून बापाने धाव घेतली पण अखेर... title=

सुपरमार्केटमध्ये फ्रिज उघडताना विजेचा धक्का लागल्याने एका 4 वर्षाच्या चिमुरडीला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तेलंगणात घडलेली ही घटना सुपरमार्केटमधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मुलगी आपल्या आई-वडिलांसह सामान खरेदी करण्यासाठी गेली होती. यावेळी तिने चॉकलेट घेण्यासाठी फ्रिज उघडला असता विजेचा धक्का बसला. यानंतर मुलीचे वडील तिला खांद्यावर उचलून रुग्णालयात पोहोचले होते. जी रिशिता असं या मुलीचं नाव असून तिचा मृत्यू झाला आहे. 

2 ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त सुट्टी असल्याने मुलगी आपल्या आई-वडिलांसह सुपरमार्केटमध्ये खरेदीसाठी गेली होती. खरेदी केल्यानंतर मुलीचे आई-वडील बिल भरण्यासाठी काऊंटरवर गेले होते. यादरम्यान रिशिता चॉकलेट घेण्यासाठी फ्रिजच्या दिशेने निघाली होती. यावेळी तिच्या आईने तिला रोखलं आणि आपल्यासह घेऊन गेली. पण काही वेळाने मुलगी पुन्हा फ्रिजकडे गेली आणि घात झाला. 

"आई-वडील पुन्हा व्यग्र झाल्यानंतर मुलगी पुन्हा एकदा फ्रिजच्या दिशेने चालत गेली. तिने चॉकलेट घेण्यासाठी फ्रिजचा दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केला असता, विजेचा धक्का लागला. यानंतर मुलगी तिथेच खाली पडली. रिशिताचे वडील राजा शेखर हे काही अंतरावरच उभे होते. ते बाजूच्या फ्रिजमधून आईस्क्रीम घेत होते. त्यांनी मुलीला शॉक लागून खाली कोसळताना पाहिलं. मुलगी बेशुद्ध पडल्याने त्यांना तात्काळ रुग्णालय गाठलं. पण तिथे पोहोचताच तिला मृत घोषित करण्यात आलं," अशी माहिती पोलिसांनी दिला आहे.

यानंतर सुपरमार्केटमधील कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही तपासलं. यावेळी त्यांना फ्रिजमुळे विजेचा धक्का लागल्याचं समोर आलं. अर्थिंग नसल्याने फ्रिजला हात लावल्याने विजेचा धक्का लागत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यानंतर मुलीचे पालक आणि नातेवाईकांनी आंदोलन करत कारवाईची मागणी केली. 

रिशिताच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सुपरमार्केटविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.