देशभरात गेल्या 24 तासांत 43,071 नव्या रूग्णांची नोंद; मृत्यूचा आकडा वाढला

भारतातील कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय मात्र धोका अजून टळलेला नाहीये.

Updated: Jul 4, 2021, 12:15 PM IST
देशभरात गेल्या 24 तासांत 43,071 नव्या रूग्णांची नोंद; मृत्यूचा आकडा वाढला title=

मुंबई : भारतातील कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय मात्र धोका अजून टळलेला नाहीये. देशभरात गेल्या 24 तासांत, कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये घट झाली आहे मात्र मृत्यूंची संख्या वाढली आहे. 27 जूनपासून देशात सतत 50 हजारांहून कमी नवीन कोरोना प्रकरणं नोंदवली जात आहेत.

दुसरीकडे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 43,071 रुग्ण आढळले आणि 955 कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सरकारी आकड्यांनुसार, देशात सलग 52 व्या दिवशी कोरोना संसर्गाच्या नवीन प्रकरणांपेक्षा बरं झालेल्या रूग्णांची संख्या आहे. गेल्या 24 तासांत बरं झालेल्या रूग्णांची संख्या 52,299 होती. भारतात 3 जुलै पर्यंत 35 कोटींपेक्षा जास्त लोकांना कोरोना लस डोस देण्यात आली आहे. आतापर्यंत 41 कोटीहून अधिक कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. 

शनिवारी, 44,111 नवीन कोरोनाची प्रकरणं समोर आली आणि 738 संक्रमित लोकांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे कोरोनातून बरे झाल्यानंतर 57,477 लोक घरी परतले.

देशातील कोरोनामुळे होणारं मृत्यूचं प्रमाण 1.31 टक्के आहे. तर एक्टिव्ह प्रकरणं 2 टक्क्यांपेक्षा कमी आहेत. एक्टिव्ह प्रकरणांच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात अमेरिका आणि ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात आहेत.

दुसरीकडे, निती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल म्हणाले की, "अजूनही आपण दुसर्‍या लाटेशी लढा देत आहोत. कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. तिसरी लाट येईल की नाही हे आपल्या हातात आहे. जर आपण शिस्तबद्ध राहिलो तर ही लाट येणार नाही. चैन ऑफ ट्रांसमिशन थांबवणं आवश्यक आहे."