UP Accident: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) भीषण अपघात झाला आहे. वेगात धावणाऱ्या ट्रकने पिकअप व्हॅनला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात 8 जण ठार झाले असून 15 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. दौलतपूर-काशीपर महामार्गावर हा अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक प्रचंड वेगात होता. याच वेगात असताना त्याने पीकअप व्हॅनला धडक दिली. दौलतपूर मार्गावर भागतपूर पोलीस स्टेशनच्या अख्त्यारित हा अपघात झाला आहे.
पिकअप व्हॅनमधून एक कुटुंब लग्नाला हजेरी लावण्यासाठी निघालं होतं. मात्र अपघातामुळे काळाने घाला घातला असून काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. एका साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार, अपघात इतका भीषण होता की धडक दिल्यानंतर ट्रक व्हॅनवर पलटला होता.
अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले होते. यामध्ये एसएसपी आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता. अपघातानंतर काही वेळातच बचावकार्य सुरु कऱण्यात आलं होतं. अधिकारी या बचावकार्यावर लक्ष ठेवून होते. अपघातानंतर अनेक प्रवासी वाहनाच्या आतमध्येच अडकले होते. फार प्रयत्न करुन अखेर त्यांना बाहेर काढण्यात यश आलं.
या अपघातात 15 लोक जखमी झाले आहेत. उपाचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींमध्ये दोन्ही वाहनांमधील प्रवाशांचा समावेश आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. लवकरच मृतदेहांचं शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबाकडे सोपवले जाणार आहेत.
शनिवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मध्ये प्रदेशच्या सीमेला लागून असणाऱ्या महोई गावात भीषण अपघात झाला. लग्नाहून परतणाऱ्या वरातींच्या बसला ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेनंतर बस पलटी झाली होती. या अपघातात बसचा चालक, कंडक्टर आणि तीन वरातींचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
Jalaun, UP | Five people died and 15 others were injured after a bus collided with another vehicle. The incident took place near Gopalpura under Madhogarh Kotwali area. The deceased were returning from a marriage function. Necessary action is being taken in the matter: Iraj Raja,… pic.twitter.com/1tvMDLP25j
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 7, 2023
लग्न संपल्यानंतर बस मधेला गावाकडे निघाली होती. बसमध्ये जवळपास ६० लोक होते. दरम्यान, पहाटे अडीचच्या सुमारास भिंड मार्गावरील महोई गावाजवळ भरधाव येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, बसचे दोन तुकडे झाले. रस्त्याच्या कडेला दहा फूट अंतरावर छताचा काही भाग उलटला होता.
जखमींना रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. नंतर त्यांना झाशीच्या वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आलं. अपघातामुळे लग्नाच्या आनंदाचं वातावरणाचं रुपांतर दु:खात झालं होतं. अपघातानंतर पोलीस अधीक्षक डॉ.इराज राजा यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. हा अपघात कसा झाला याचा तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.