पंजाबमध्ये मोठी दुर्घटना! गॅस लीक झाल्याने 11 जण ठार, मृतदेह निळे पडले?; संपूर्ण परिसर सील

Punjab Gas Leak: पंजाबमध्ये (Punjab) गॅस लीक झाल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. तसंच डॉक्टर, रुग्णवाहिका यांनाही तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 30, 2023, 01:51 PM IST
पंजाबमध्ये मोठी दुर्घटना! गॅस लीक झाल्याने 11 जण ठार, मृतदेह निळे पडले?; संपूर्ण परिसर सील title=

Punjab Gas Leak: पंजाबमधील (Punjab) लुधियाना (Ludhiana) येथील गियासपुरा येथील एका फॅक्टरीतून गॅस लीक (Gas Leak) झाल्याने 11 जण ठार झाले आहेत. तसंच 11 जणांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच बचावपथक घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे. तसंच डॉक्टर आणि रुग्णवाहिका यांना तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आलं आहे. दरम्यान, सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. 

"हो नक्कीच गॅस लीक झाला आहे. एनडीआरएफ पथकही घटनास्थळी दाखल झालं असून लोकांना बाहेर काढलं जात आहे. बचावकार्यही सुरु करण्यात आलं आहे. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 11 जणांची प्रकृती गंभीर आहे," अशी माहिती लुधियानाच्या उपविभागीय दंडाधिकारी स्वाती तिवाना यांनी दिली आहे. 

दरम्यान गॅस लीक किती गंभीर आहे आणि कशामुळे झालं आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही. एनडीआरएफ याप्रकरणी अधिक तपास करत करेल अशी माहिती स्वाती यांनी दिली आहे. 

स्थानिक अंजन कुमार याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की "हा विषारी गॅस होता. जवळपास 8 लोक ठार झाले आहेत. तीन मृतदेह निळे पडले होते. श्वास घेण्यासही जमत नाही".

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ही दुर्दैवी घटना असल्याचं म्हटलं आहे. तसंच शक्य ती सर्व मदत दिली जात असल्याची माहिती दिली आहे. भगवंत मान यांनी ट्वीट केलं आहे. "लुधियानात झालेली गॅस लीकची घटना दुर्दैवी आहे. पोलीस प्रशासन, एनडीआरएफ घटनास्थळी दाखल झालं आहे. सर्व मदत केली जात आहे", असं भगवंत मान यांनी ट्वीटमध्ये सांगितलं आहे. 

दरम्यान या घटनेनंतर स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण असून 11 जण ठार झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.