'मी उडी मारतो, तुम्ही व्हिडीओ काढा,' स्टंटच्या नादात मृत्यूच झाला कॅमेऱ्यात कैद, खडकांमधील मृतदेह पाहून पोलीसही हादरले

Viral Video: चेन्नईतील (Chennai) तळकोना धबधब्यात (Talakona Waterfall) मित्रांसह गेलेल्या एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाण्यात उडी मारल्यानंतर दोन दगडांच्या मधे डोकं अडकल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, पाण्यात उडी मारण्याआधीचा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 2, 2023, 05:06 PM IST
'मी उडी मारतो, तुम्ही व्हिडीओ काढा,' स्टंटच्या नादात मृत्यूच झाला कॅमेऱ्यात कैद, खडकांमधील मृतदेह पाहून पोलीसही हादरले title=

Viral Video: सध्या सोशल मीडिया (Social Media) म्हणजे प्रतेकाच्या आयुष्याचा अविभाज्य भागच झाला आहे. सोशल मीडियावर आपले व्हिडीओ व्हायरल व्हावेत यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. यासाठी अनेकदा तरुण जीव धोक्यात टाकत असतात. त्यातही सध्या रिलचा जमाना असल्याने तिथे ट्रेंडिग ऑडिओवर साजेसा व्हिडीओ टाकता यावा यासाठी प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न असतो. अशाच प्रयत्नात चेन्नईतील एका तरुणाने आपला जीव गमावला असून ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 22 वर्षीय तरुणाने पाण्यात उडी मारल्यानंतर बराच वेळानंतरही तो वरती न आल्याने मित्रांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. दरम्यान, शोध घेतला असता दोन दगडांमध्ये त्याचा अडकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. 

चेन्नईमधील (Chennai) 22 वर्षीय विद्यार्थी आपल्या मित्रांसह तिरुपतीजवळ असणाऱ्या तळकोना धबधब्यावर (Talakona Waterfall) गेले होते. सुमंथ असं या तरुणाचं नाव असून तो मूळचा कर्नाटकच्या मंगळुरुचा आहे. आपल्या मित्रांसह पिकनिकच्या निमित्ताने तो धबधब्यावर आला होता. 

सुमंथ यावेळी पाण्यात उडी मारण्यासाठी उंचावर गेला होता. यावेळी इन्स्टाग्राम रिलसाठी त्याने आपल्या मित्रांना पाण्यात उडी मारताना व्हिडीओ शूट करण्यास सांगितलं. त्यानुसार त्याच्या मित्रांनी कॅमेऱ्यात व्हिडीओ रेकॉड्र करण्यास सुरुवात केली होती. व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, सुमंथ वर कड्यावर गेला आणि 10 ते 15 फूट अंतरावरुन पाण्यात उडी मारली. 

पाण्यात उडी मारल्यानंतर कदाचित तो खाली आपटला असावा. कारण नंतर तो वरती येण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. पण नंतर तो बराच वेळ पाण्यातून बाहेर आला नाही तेव्हा त्याचे मित्र घाबरले. त्याचा शोध लागत नाही हे लक्षात आल्यानंतर मित्रांनी पोलीस आणि वन विभागाकडे धाव घेतली. 

यानंतर बचावपथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं आणि सुमंथचा शोध सुरु केला. बराच शोध घेऊनही मृतदेह सापडत नव्हता. त्यात अंधार झाल्याने बचावकार्य थांबवण्यात आलं. यानंतर शनिवारी सकाळी सुमंथचा पाण्याच्या खाली मृतदेह सापडला. त्याचं डोकं दोन दगडांच्या मधोमध अडकलेलं होतं. दगडात अडकल्याने श्वास गुमदरुन त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केला. 

सुमंथ हा चेन्नईमदील राजीव गांधी कॉलेजात शिक्षण घेत होता. गेल्या काही महिन्यात या धबधब्यावर घडलेली अशा प्रकारची ही तिसरी दुर्घटना आहे.