प्रियकरासाठी आईनं पोटच्या मुलाची केली हत्या; मृतदेह शोधताना पोलिसांच्या आले नाकीनऊ

Gujarat Crime : गुजरातमध्ये घडलेल्या या हत्याकांडाने पोलिसही चक्रावले आहेत. आईनेच पोटच्या मुलाची हत्या करुन त्याचा मृतदेह लपवल्याचा धक्कादायक प्रकार सूरतमध्ये उघडकीस आला आहे. पोलिसांनी सखोल चौकशीनंतर आरोपी आईला अखेर अटक केली आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 2, 2023, 12:25 PM IST
प्रियकरासाठी आईनं पोटच्या मुलाची केली हत्या; मृतदेह शोधताना पोलिसांच्या आले नाकीनऊ title=
(प्रातिनिधीक छायाचित्र - PTI)

Crime News : गुजरातमधील (Gujarat Crime) सुरत शहरात अडीच वर्षांच्या चिमुरड्याची आई नयना मांडवी हिने आपले मूल बेपत्ता झाल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी पोलीस (Gujarat Police) ठाण्यात दाखल केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर नयनाने सलग तीन दिवस मुलाचा शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. पोलिसांना या प्रकरणात नयनावरच संशय येऊ लागल्याने त्यांनी तिला ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या चौकशीत नयनाने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. प्रियकरासाठी नयनाने तिच्याच मुलाची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुलाच्या हत्यनेनंतर नयनाने त्याचा मृतदेह लपवून ठेवला होता. पण ती सतत पोलिसांना चुकीची उत्तरे देत होती. मुलाच्या हत्येआधी दृश्यम (drishyam) चित्रपट पाहिल्याचे खळबळजनक सत्यही नयनाने पोलीस चौकशीत सांगितलं आहे.

पोलिसांनी खंगाळले सीसीटीव्ही

सुरतच्या दिंडोली भागातील एका बांधकामाच्या ठिकाणी मजूर असलेल्या नयना मांडवीने आपला अडीच वर्षांचा मुलगा वीर मांडवी हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती.  पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. पोलिसांनी महिला काम करत असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली. मात्र  सीसीटीव्हीमध्ये वीर कुठेही बाहेर जाताना दिसला नाही. बेपत्ता वीरचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी श्वानपथकाचीही मदत घेतली. श्वानपथकही बांधकामाच्या जागेच्या बाहेर गेले नाही. यानंतर वीर तिथून कुठेच बाहेर गेला नाही हे पोलिसांनी निश्चित केले. 

मात्र या सगळ्यात नयना काहीतरी लपवत असल्याचे पोलिसांना कळून चुकलं होतं. म्हणून त्यांनी तिची चौकशी करण्यास सुरुवात केली. पोलीस नयनाला वीर कुठे हरवला याबाबत अनेक प्रश्न विचारत होते, मात्र ती  कोणतेही समाधानकारक उत्तर देऊ शकली नाही. चौकशीदरम्यान, नयनाने सांगितले की, तिचा एक प्रियकर झारखंडमध्ये राहतो. त्यानेच वीरचे अपहरण केले असावे. यानंतर पोलिसांनी तिच्या प्रियकराशी संपर्क साधून त्याचे लोकेशनही ट्रेस केले. मात्र गेले कित्येक दिवस तो सुरत काय गुजरातच्या जवळही आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे नयनाचं खोटं बोलत असल्याचे पोलिसांना समजलं.

सतत खोटं बोलत होती नयना

पोलिसांच्या चौकशीत नयना वारंवार खोटं बोलत होती. यानंतर पोलिसांनी नयनाची कडक चौकशी सुरू केली. त्यानंतर तिने वीरची हत्या केल्याची कबुली दिली. हत्येनंतर वीरचा खड्ड्यात मृतदेह पुरल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून पाहिला असता तिथे काहीच आढळले नाही. परत नयनाकडे चौकशी केली असता तिने सांगितले की वीरचा मृतदेह तलावात फेकला आहे. पोलिसांनी तलावात सुद्धा शोधकार्य सुरु केले. मात्र पोलिसांना तलावतही काही सापडलं नाही. त्यानंतर पोलिसांनी नयनाला खरं बोलण्याची ताकीद दिली. शेवटी नयनाने सांगितले की त्याच बांधकामाच्या जागेवर शौचालयासाठी केलेल्या खड्ड्यात वीरचा मृतदेह टाकला आहे. त्यानंतर पोलिसांनी जाऊन पाहिले असता तिथे वीरचा मृतदेह सापडला.
 
कशासाठी केली हत्या?

नयना ही मूळची झारखंडची आहे. तिथेच नयनाच एक प्रियकर आहे. प्रियकराने नयनाला सांगितले होते की, जर तू तुझ्या मुलाला घेऊन माझ्याकडे आली तर मी तुला स्वीकारणार नाही. जर तू एकटीच आलीस तरच मी तुला स्वीकारेल. प्रियकराचे म्हणणे ऐकल्यानतंर नयनाने वीरला संपवण्याचा निर्णय घेतला. हत्येनंतर पकडले जाऊ नये आणि मृतदेह लवपण्यासाठी आपण दृश्यम चित्रपट पाहिला होता असे नयनाने पोलिसांत सांगितले. मुलाची हत्या केल्यानंतर नयनाने पोलिसांनाही दृश्यमप्रमाणेच माहिती दिली असे केल्याने पोलिसांना आपल्याला अटक करता येणार नाही आणि मी झारखंडमध्ये प्रियकराकडे जाईल, असे या नयनाला वाटत होते. मात्र पोलिसांनी सखोल चौकशीनंतर नयनाला अटक केली आहे.