कोरोनाचा धोका असताना छठपूजेसाठी मंदिरात महिलांनी मोठी गर्दी

उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमध्येही गुरू गोरखनाथ मंदिर परिसरात महिलांनी मोठी गर्दी केली.  

Updated: Nov 20, 2020, 10:45 PM IST
कोरोनाचा धोका असताना छठपूजेसाठी मंदिरात महिलांनी मोठी गर्दी  title=
संग्रहित छाया

मुंबई : उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमध्येही गुरू गोरखनाथ मंदिर परिसरात महिलांनी मोठी गर्दी केली. चार दिवसांचे छठपूजेचं महापर्व उद्या संपत आहे. पण आज मावळत्या सूर्याची पूजा करण्यासाठी छठ घाट, भीम सरोवर परिसरात लोकांनी तुफान गर्दी केली. बघावं तिकडे महिलांची पूजा अर्चना सुरू होती. गोरखपूरमध्येही कोरोना प्रतिबंधात्मक सगळे नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचं दिसले. 

हजारो महिला नदी काठावर

उत्तर प्रदेशातल्या लखनऊ शहरातही हजारो महिला नदी काठावर जमल्या. गोमती नदीच्या काठी मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्यासाठी आणि पूजेसाठी महिला-पुरुषांनी तोबा गर्दी केली. भाजप शासित उत्तर प्रदेश सरकारनं छठपूजेसाठी सौम्य नियम लावल्यानं कोरोनाच्या नियमांना हरताळ फासत लोक वावरताना दिसले. 
२१ नोव्हेंबरला  म्हणजे उद्या या छठपूजा महापर्वाची सांगता होणार आहे. 

गोरखपूर । नदीच्या घाटावर मोठी गर्दी

बिहार, उत्तर प्रदेश, झारखंडसह अनेक राज्यात छठपूजेचं महापर्व सुरू झाले आहे. त्यासाठी गोरखपूरमध्येही नदीच्या घाटावर मोठी गर्दी झाली. ३६ तासांपासून उपवास करणाऱ्या महिलांनी आज मावळत्या सुर्याला अर्घ्य अर्पण केलं. उद्याही या महिला पहाटे उगवत्या सुर्याला अर्घ्य अर्पण करतील. पण या छठपूजेमुळं नदीकिनारी आणि घाटांवर तुफान गर्दी झाल्याचं चित्र बघायला मिळालं.. कोरोना काळात ही गर्दी परवडणारी नाही. 

मुंबई समुद्र किनारे पूर्णपणे रिकामे 

दरवर्षी छठपूजेला गजबजणारे मुंबई समुद्र किनारे आज पूर्णपणे रिकामे होते. राज्य सरकारनं दिलेल्या निर्देशानुसार पोलिसांनी कुणालाही समुद्र किनारी छठपुजेला लोकांना येऊ दिलं नाही.. आज सकाळपासूनच पोलिसांचा मोठा फौजफाटा मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर तैनात करण्यात आलेत. दुपारी अनेक लोक छठपूजेसाठी समुद्रकिनारे जमू लागले होते. पण नियमांमुळे पोलिसांनी कुणालाही समुद्र किनारी जाऊ दिलं नाही.