उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) झांसी (Jhansi) येथील एक घटना समोर आली आहे, जी ऐकल्यानंतर प्रत्येकजण आश्चर्य व्यक्त करत आहे. याचं कारण असं काही होऊ शकतं यावर अनेकांचा विश्वासच बसत नाही. पतीचा मृत्यू झाल्यानंतर हे दु:ख सहन न झाल्याने पत्नीनेही जीव सोडला. यानंतर त्यांची ही प्रेमकहाणी चर्चेचा विषय ठरत आहे. पण एकाच घरातून एकावेळी दोन मृतदेह बाहेर पडल्याने नातेवाईकांसह गावकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले होते.
बघौरा गावात राहणारे 50 वर्षीय प्रीतम रविवारी नेहमीप्रमाणे आपल्या म्हशी चरण्यासाठी शेतात गेले होते. बघौरा गावात पावसाळ्यात बंधाऱ्याचे पाणी शेताच्या वाटेवर येते. प्रीतम शेतात गेले होते तेव्हा पाण्याची पातळी कमी होती. मात्र आजूबाजूच्या भागात पाऊस झाल्याने पाण्याची पातळी अचानक वाढली. पण प्रितम यांना याची अजिबात कल्पना नव्हती.
संध्याकाळी घरी परतत असताना प्रितम हे पाण्यात बुडाले आणि मृत्यू झाला. प्रितम बराच वेळ झाला तरी शेतातून घरी परतले नसल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरु केला होता. यावेळी बंधाऱ्याच्या किनारी प्रितम यांची चप्पल सापडली. यानंतर नातेवाईकांना पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस यानंतर घटनास्थळी दाखल झाले आणि बंधाऱ्यात मृतदेहाचा शोध सुरु केला. यावेळी डायव्हर्सची मदत घेण्यात आली. यानंतर बंधाऱ्यातच प्रितम यांचा मृतदेह सापडला.
प्रितम यांचा मृतदेह सापडल्यानंतर संपूर्ण कुटुंबावरच शोककळा पसरली. प्रितम यांच्या पत्नीवर तर आभाळच कोसळलं होतं. त्यांच्यातील प्रेम इतकं होतं की अंत्यसंस्काराच्या दोन तास आधीच गीता यांनीही आपले प्राण सोडले. यानंतर सर्व नातेवाईकांनाही धक्का बसला. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यात फार प्रेम होतं. ते एकमेकांवर फार प्रेम करत होते. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. तिघांचंही लग्न झालं आहे.
प्रितम यांचे नातेवाईक उधम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ते म्हशी घेऊन शेतात गेले होते. पण रस्त्यातील बंधाऱ्यातील पाणी वाढल्याने त्यात बुडून त्यांना जीव गमवावा लागला. बराच वेळ झाली तरी ते घऱी न आल्याने नातेवाईकांना चिंता सतावू लागली आणि शोध सुरु केला. शोध घेत असताना बंधाऱ्याजवळ प्रितम यांची चप्पल सापडली. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. जवळपास 3 तास शोध घेतल्यानंतर प्रितम यांचा मृतदेह हाती लागला. पतीच्या मृत्यूनंतर 47 वर्षीय पत्नी गिता यांना काही सुचत नव्हतं. त्या आधीच आजारी होत्या. शवविच्छेदनानंतर आम्ही अंत्यसंस्काराची तयारी करत होतो. त्याचवेळी गीतानेही आपल्या पतीचा विरह सहन न झाल्याने जीव सोडला.