"चौथी पास राजाला कळत नाही की..."; केजरीवाल यांची PM मोदींवर सडकून टीका; महाराष्ट्राचाही उल्लेख

Arvind Kejriwal attacks PM Modi: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि 'आप'चे सर्वसर्वा अरविंद केजरीवाल यांनी रामलीला मैदानामधील 'आप'च्या महामेळाव्यामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच केंद्र सरकारच्या कारभारावर कठोर शब्दांमध्ये ताशेरे ओढले आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 11, 2023, 02:18 PM IST
"चौथी पास राजाला कळत नाही की..."; केजरीवाल यांची PM मोदींवर सडकून टीका; महाराष्ट्राचाही उल्लेख title=
दिल्लीमधील जाहीर सभेतून केली टीका

Arvind Kejriwal attacks PM Modi: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Modi) सडकून टीका केली आहे. दिल्लीमधील रामलीला मैदानामध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या आपच्या सभेमध्ये भाषण देताना केजरीवाल यांनी मोदींचा उल्लेख 'चौथी पास राजा' असा करत केंद्र सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. विशेष म्हणजे यावेळेस केजरीवाल यांनी महाराष्ट्राचाही उल्लेख केला.

इतका अहंकारी पंतप्रधान

12 वर्षांपूर्वी म्हणजेच 2011 साली झालेल्या अण्णा हजारेंच्या आंदोलनाची आठवण केजरीवाल यांनी यावेळी करुन दिली. "आज 12 वर्षांपूर्वी भ्रष्टाचाराविरोधात याच रामलीला मैदानामध्ये आपण एकत्र जमलो होतो. आज याच मंचावरुन एका अहंकारी हुकुमशालाहा या देशातील सत्तेतून हटवण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. आज याच मंचावरुन आपण आंदोलन सुरु करत आहोत आणि हे आंदोलन सुद्धा पूर्ण होणार," असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला. तसेच पुढे बोलताना, "19 मे रोजी देशाच्या पंतप्रधानांनी सुप्रीम कोर्टाचा निकाल फेटाळला. पंतप्रधान म्हणतात की सुप्रीम कोर्टाला मानत नाही. 75 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे पंतप्रधान मिळाले आहेत जे सुप्रीम कोर्टालाही जुमानत नाहीत. देशभरातील सर्वच लोक थक्क झाले आहेत. देशातील लोकांना विश्वास बसत नाही इतका अहंकार पंतप्रधानांमध्ये आहे," अशी घणाघाती टीकाही पंतप्रधानांनी केली.

आपल्यालाच सत्ता चालवायची आहे असा मोदींचा हट्ट

अध्यादेश काढून आपल्यालाच सरकार चालवायचं आहे असा मोदींचा हट्ट असल्याची टीकाही दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी केली. "सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयामध्ये दिल्लीची जनताच सुप्रीम असल्याचं म्हटलं होतं. मात्र पंतप्रधानांनी अध्यादेश पारित करुन हे आदेश रद्द केला. अध्यादेशामध्ये आता दिल्लीमध्ये लोकशाही दिसणार नाही असं म्हटलं आहे. आता दिल्लीत हुकूमशाही चालणार. आता जनता सुप्रीम नाही. आता जनता नाही नायाब राज्यपाल सुप्रीम आहेत. जनता कोणालाही मतदान करु दे आणि निवडून आणू देत पंतप्रधान म्हणत आहेत की मीच सरकार चालवणार," असा टोला केजरीवाल यांनी लगावला.

महाराष्ट्राचाही केला उल्लेख

अध्यादेशासंदर्भात विरोधी पक्षांची मोट बांधत असल्याचं सांगतानाच केजरीवाल यांनी महाराष्ट्राचीही उल्लेख केला. "या अध्यादेशाविरोधात सर्व पक्षांच्या नेत्यांची मी भेट धेत आहे. दिल्लीतील लोकांनी हे लक्षात ठेवावं की सर्व देशातील लोक तुमच्याबरोबर आहेत. 140 कोटी जनता एकत्र येऊन अध्यादेशाचा विरोध करणार आणि लोकशाहीला वाचवणार. हे केवळ दिल्लीतील लोकांबरोबर झालं आहे असा विचार करु नका. असाच अध्यादेश राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्रासाठी आणला जाईल. त्याआधीच यांना थांबवलं पाहिजे," असं केजरीवाल म्हणाले.

आम्हालाच दिल्लीचा कौल

दिल्लीत आमच्या बाजूनेच जनमताचा कौल आहे असंही केजरीवाल म्हणाले. "दिल्लीतील लोकांना 2014 मध्ये मोदींना 7 जागा दिल्या. मात्र 70 पैकी 3 जागाच भाजपाला दिल्या. राज्यातील 67 जागांवर आप जिंकून आली. त्यानंतर 2019 मध्ये त्यांना देश संभाळण्यासाठी दिला. मात्र 70 पैकी 62 जागा आपला दिल्या आणि केजरीवालला पुन्हा दिल्ली संभाळण्यास दिली. मात्र यानंतरही ते दिल्लीतील लोकांच्या मागे लागले आहेत. तुम्हाला देश संभाळता येत नाहीय. दूध, भाज्या, एलपीजी गॅस किती महाग झाला आहे," असं केजरीवाल म्हणाले.

"चौथी पास राजाला समजत नाही आहे की..."

केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा त्यांच्या शिक्षणावरुन निशाणा साधला आहे. "चौथी पास राजाला समजत नाही आहे की देश कसा चालवायचा. सगळीकडे बेरोजगारी वाढली आहे. यांना समजत नाहीय की बेरोजगारी कशी दूर करायची. भ्रष्टाचार कसा दूर करावा हे यांना कळत नाही. जीएसटीमुळे व्यापारी वैतागले आहेत. रेल्वेची काय अवस्था करुन ठेवलीय. 2002 मध्ये गुजरातचे पंतप्रधान झाले. 12 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री राहिले. मागील 9 वर्षांपासून पंतप्रधान आहेत. 21 वर्ष झाले ते सत्तेत आहेत. मी 2015 मध्ये मुख्यमंत्री झाले. मी सत्तेत येऊन 8 वर्ष झाले आहेत. मी आज त्यांना आव्हान देतो 21 वर्ष आणि 8 वर्षांची तुलना केल्यास कोणी जास्त काम केलं आहे तपासून पाहा," असा टोला केजरीवाल यांनी लगावला. 

मित्रालाच वाटल्या रेवड्या...

"मोदीजी म्हणतात की विरोधक गरिबांना रेवड्या (मोफत गोष्टी) वाटतात. अरे मी तरी गरिबांच्या हाती चार रेवड्या दिल्या आहेत. त्यामुळे वढं काय झालं? तुम्ही तर साऱ्या रेवड्या तुमच्या मित्राच्या हाती दिल्या आहेत," असं म्हणत केजरीवाल यांनी मोदींना टोला लगावला. 

आमच्याकडे 100 सिसोदिया

केजरीवाल यांनी, "मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना तुरुंगात टाकल्याने आमची कामं थांबतील असं मोदीजींना वाटलं होतं. आमच्याकडे एक नाही 100 सिसोदिया आणि 100 सत्येंद्र जैन आहेत. आमच्यासाठी काम करायला दुसरे लगेच तयार आहेत. यांना तुरुंगात टाकून काम झालं नाही तर अध्यादेश काढला. दिल्लीतील लोकांनावर अध्यादेश लादला जात आहे. दिल्लीतील सातही खासदार घरांमध्ये लपून बसले आहेत," अशी टीकाही केली.