माहेरी पाठवत नसल्याने पत्नीने भावांना बोलावलं, त्यांना पाहताच पतीने रिव्हॉल्व्हर काढलं अन्....

Haryana Crime : हरियाणामध्ये एका व्यक्तीने पत्नी आणि दोन मेव्हण्यांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. राकेश पंडित असे आरोपीचे नाव आहे. या घटनेनंतर आरोपीने मुलांसह घरातून पळ काढला आहे. पोलीस आरोपीच्या शोधात आहे.  

आकाश नेटके | Updated: Jun 11, 2023, 01:45 PM IST
माहेरी पाठवत नसल्याने पत्नीने भावांना बोलावलं, त्यांना पाहताच पतीने रिव्हॉल्व्हर काढलं अन्.... title=

Crime News : हरियाणाच्या (Haryana News) हिस्सारमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तिहेरी हत्याकांडाने हरियाणा हादरलं आहे. पतीनेच पत्नी आणि दोन मेव्हण्यांची निर्घृण हत्या (Crime News) केली आहे. तिघांचीही पतीने गोळ्या झाडून हत्या केली. गोळी लागल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. तिघांचेही मृतदेह घराच्या अंगणात सापडले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी (Haryana Police) आणि पथक घटनास्थळी पोहोचले असून तपास करत आहेत.

आरोपीने परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने तिघांचीही हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना घटनास्थळी सात काडतुसे सापडली आहेत. हिस्सारचे पोलीस अधिक्षक गंगाराम पुनिया यांनी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाची पाहणी केली. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलीस अधिक्षक गंगाराम पुनिया म्हणाले.फॉरेन्सिक टीम घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहे.

मनजीत सिंग, मुकेश कुमार आणि सुमन अशी मृतांची नावे असून धनना गावातील रहिवासी आहेत. राकेश पंडित असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने महापालिकेच्या नगरसेवकपदाची निवडणूकही लढवली आहे. राकेश पंडित याने रविवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास कृष्णा नगर टॉवरजवळ दोन मेहुणे मनजीत सिंग आणि मुकेश कुमार यांच्यासह पत्नीची कपाळावर आणि छातीवर गोळी मारून हत्या केली.

नेमकं काय घडलं?

मुलांच्या शाळेला सुटी असल्याने पत्नी सुमन तिच्या माहेरी जाण्याची मागणी करत होती. याच मुद्द्यावरून गेल्या दोन-तीन दिवसांपासून पती पत्नीमध्ये भांडण सुरू होते. पत्नीने रविवारी सकाळी आई-वडिलांना फोन करून दोन्ही भाऊ मनजीत सिंग आणि मुकेश कुमार यांना घरी बोलावले. मेव्हणे घरी आल्याने वाद अधिकच चिघळला. यादरम्यान हे प्रकरण हाणामारीत पोहोचले आणि रागाच्या भरात  राकेश पंडितने आधी रिव्हॉल्व्हरने दोन्ही भावांवर आणि नंतर पत्नीवर गोळ्या झाडल्या.

दरम्यान, आरोपी राकेश पंडितने त्याच्या 32 बोअरच्या परवाना असलेली रिव्हॉल्व्हर काढून तिघांवरही गोळ्या झाडल्या. त्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळावरून राकेश पंडित त्याच्या दोन मुलांसह पळून गेला. घटनेची माहिती मिळताच हिस्सार पोलिसांचे उच्चपदस्थ अधिकारी आणि अर्बन इस्टेट पोलीस ठाण्याचे प्रभारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आजूबाजूचा परिसर सील केला असून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

आरोपीने डिसेंबर 2018 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत सहभाग घेतला होता. त्यावेळी राकेशने ईव्हीएममध्ये गडबड झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यापूर्वीही आरोपीने नगरसेवकपदाची निवडणूक लढवली आहे. तर दुसरीकडे फेब्रुवारी 2020 मध्ये राकेश पंडितवर कृष्णा नगर येथील घराबाहेर कार आणि बुलेटस्वार तरुणांनी गोळीबार केला होता. हल्ल्यावेळी राकेश कारने घरी जात होते. सुमारे 12-13 गोळ्या राकेशवर हल्लेखोरांनी झाडल्या होत्या. राकेशला पाच गोळ्या लागल्या होत्या.