पंतप्रधान मोदी स्वदेशी सोशल मीडिया लाँच करणार?

या सगळ्यामागे नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असल्याची माहिती आता समोर येत आहे.

Updated: Mar 3, 2020, 12:21 PM IST
पंतप्रधान मोदी स्वदेशी सोशल मीडिया लाँच करणार? title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी रात्री ट्विट करून सोशल मीडियावरून (Social Media) संन्यास घेण्याचे संकेत दिले. येत्या रविवारी ते याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मोदींच्या या ट्विटनंतर देशभरात निरनिराळ्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आजच्या टेक्नोसॅव्ही युगात सोशल मीडियाला कायमचा रामराम करण्याचा आत्मघातकी निर्णय मोदी कसा घेऊ शकतात, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. 

मात्र, या सगळ्यामागे नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असल्याची माहिती आता समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नरेंद्र मोदी फेसबुक, ट्विटर, यूट्युब आणि इन्स्टाग्राम या सर्व व्यासपीठांवरून एक्झिट घेतील. यानंतर नरेंद्र मोदी नव्या स्वदेशी व्यासपीठावर शिफ्ट होतील, असा सूत्रांचा अंदाज आहे. 

सोशल मीडिया हा भाजपचा आत्मा; मोदी तो कसा काढणार- संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रात 'मेक इन इंडिया'चा (Make In India) आग्रह धरला आहे. त्यामुळे रविवारी ते स्वदेशी सोशल मीडिया लाँच करु शकतात. गुगलला टक्कर देण्यासाठी हे व्यासपीठ तयार करण्यात आल्याचे सांगितले जाते. 'गुटरगू' असे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नाव असेल. 

अमृता फडणवीस यांचाही सोशल मीडियाला रामराम?

यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी Namo App चा वापर करून जनतेशी संवाद साधण्याचा प्रयोग करून पाहिला होता. त्याच धाटणीवर संपूर्णपणे स्वदेशी कल्पनेवर आधारित सोशल मीडियाचे व्यासपीठ लाँच करण्याचा मोदींचा मानस आहे. 

गेल्या काही काळापासून नकारात्मक आणि खोट्या गोष्टी पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होताना दिसत आहे. त्यामुळेच या माध्यमाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय मोदींनी घेतल्याचे समजते. त्यामुळे आता रविवारी नक्की काय घडणार, याची उत्सुकता देशवासियांना लागली आहे.