राहुल गांधींची मोठी घोषणा; काँग्रेस सत्तेत आल्यास प्रत्येक गरिबाला किमान उत्त्पन्न मिळणार

या निर्णयाची १०० टक्के अंमलबजावणी होईल.

Updated: Jan 28, 2019, 06:08 PM IST
राहुल गांधींची मोठी घोषणा; काँग्रेस सत्तेत आल्यास प्रत्येक गरिबाला किमान उत्त्पन्न मिळणार title=

रायपूर: आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास देशातील प्रत्येक गरिबाला किमान उत्त्पन्न देण्याची व्यवस्था केली जाईल, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली. ते सोमवारी छत्तीसगढच्या अटलपूर येथील सभेत बोलत होते. यावेळी राहुल यांनी आगामी निवडणुकीच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण डाव खेळला. त्यांनी म्हटले की, २०१९ ची निवडणूक जिंकल्यावर काँग्रेस सत्तेत येईल तेव्हा प्रत्येक गरिबाला किमान उत्पन्न देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या निर्णयाची १०० टक्के अंमलबजावणी होईल. त्यामुळे प्रत्येक महिन्याला गरीब व्यक्तींना विशिष्ट रक्कम मिळेल. जेणेकरून देशातील कोणताही नागरिक उपाशी राहणार नाही. किमान उत्त्पन्नाची ही रक्कम थेट गरीब नागरिकांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल, असेही राहुल यांनी सांगितले.  

आगामी निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसची ही खेळी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. यापूर्वी छत्तीसगढमध्ये माजी मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांनी गरिबांच्या विकासासाठी अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या होत्या. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील (पीडीएस) आमुलाग्र बदलांमुळे गरीब नागरिकांपर्यंत सरकारी धान्य पोहोचण्याचे प्रमाण वाढले होते. छत्तीसगढमधील या मॉडेलची देशभरात चांगलीच चर्चाही झाली होती. यापूर्वी काँग्रेसने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमधील विजयानंतर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय अमलात आणला होता. त्यानंतर काँग्रेसने गरीबांसाठी किमान उत्त्पन्न देण्याची दुसरी मोठी घोषणा केली आहे. यामुळे जनता भाजपला पर्याय म्हणून काँग्रेसचा विचार करु शकते. त्यामुळे आता भाजप यावर काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.