नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संकटात भारतीय रेल्वेने रिझर्वेशनच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. ट्रेनने प्रवास करण्याआधी रिझर्वेशन करताना प्रवाशांना वेगवेगळी माहिती द्यावी लागणार आहे. प्रवाशाला जर ही माहिती देता आली नाही, तर तो रिझर्वेशन करू शकणार नाही. यामुळे रेल्वेने रिझर्वेशन फॉर्ममध्ये बदल केले आहेत. IRCTCने मोबाईल ऍप, इंटरनेट आणि काऊंटरवरच्या फॉर्ममध्येही बदल करण्यात आले आहेत.
भारतीय रेल्वेच्या नव्या नियमावलीनुसार रिझर्वेशन करताना प्रवाशाला तो कुठे चालला आहे, याबाबतची संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे. याआधी रिझर्वेशन करताना प्रवासी फक्त शहर किंवा जिल्ह्याचं नाव लिहायचा. पण आता प्रवाशाला त्याचा वैयक्तिक फोन नंबर, शहराचं नाव (सोबत कॉलनी, मोहल्ला, गाव, जवळचं पोस्ट ऑफिस), जिल्ह्याचा पिन कोड नंबर, राज्याचं नाव, ओळख पत्र याबाबत माहिती द्यावी लागेल. तिकीट बूक करताना प्रवाशाला तो प्रवास करताना जो फोन नंबर वापरणार आहे, तोच टाकणं बंधनकारक असेल. यासोबतच फोनमध्ये आरोग्य सेतू ऍपही डाऊनलोड करणं अनिवार्य करण्यात आलं आहे.
याशिवाय प्रवाशाला रिझर्वेशन करतानाच तो कोणत्या कारणासाठी प्रवास करत आहे, हे सांगावं लागणार आहे. फॉर्ममध्ये ही माहिती दिली नाही, तर रेल्वे तिकीट देणं नाकारू शकतं.
एखादा प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असेल, तर त्याची ओळख लगेच पटावी, यासाठी रेल्वेने हा नियम बनवला आहे. याआधी रिझर्वेशन करताना प्रवाशाला संपूर्ण पत्ता द्यायची गरज नव्हती.
प्रवासादरम्यान प्रवाशाला कोरोना झाला, तर त्याच्या प्रवासाच्या इतिहाससोबतच त्याच्या संपर्कात आलेले अन्य प्रवासी यांची ओळख लगेच पटून त्यांच्यावर त्वरित उपचार करण्यासाठी रेल्वेने ही नियमावली बनवली आहे.