Odisha Train Accident : ओडिशात (Odisha) तीन रेल्वेगाड्यांच्या भीषण अपघाताने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात 275 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी सीबीआय चौकशी करण्यात येणार आहे. अशातच पुन्हा एकदा ओडिशामध्ये गंभीर अपघात झालाय. ओडिशाच्या बरगढमध्ये मालगाडीचा अपघात झाला आहे. मालगाडीच्या (goods train) 5 बोगी रुळावरून घसरल्या आहेत.
अपघातग्रस्त मालगाडी चुनखडीने भरलेली होती आणि बारगढ येथे तिचे 5 डबे रुळावरून घसरले. मात्र, या अपघातात कोणाचीही हानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या अपघातानंतर ईस्ट कोस्ट रेल्वेने स्पष्टीकरण दिलं आहे. ही मालगाडी खासगी सिमेंट कंपनी चालवत असल्याचे रेल्वेने सांगितले. कंपनी नॅरोगेज साइडिंगवर मालगाडी चालत होती. रोलिंग स्टॉक, इंजिन, वॅगन, ट्रेन ट्रॅक (नॅरो गेज) यासह सर्व पायाभूत सुविधांची देखभाल कंपनी स्वतः करत आहे, असेही कंपनीने सांगितले.
#WATCH | Some wagons of a goods train operated by a private cement factory derailed inside the factory premises near Mendhapali of Bargarh district in Odisha. There is no role of Railways in this matter: East Coast Railway pic.twitter.com/x6pJ3H9DRC
— ANI (@ANI) June 5, 2023
दुसरीकडे, कर्मचाऱ्यांच्या सावधगिरीमुळे रविवारी आणखी एक रेल्वे अपघात टळला. तामिळनाडूतील कोल्लम जंक्शनवरून धावणाऱ्या चेन्नई एग्मोर एक्स्प्रेसच्या डब्याला तडा गेला होता. रेल्वे कर्मचाऱ्यांनी वेळीच हे पाहिले. डब्याच्या चाकाच्या वरच्या बाजूला हा तडा गेला होता. माहिती मिळताच हा डबा रेल्वेपासून वेगळा करण्यात आला. रेल्वेच्या एस 3 कोचला हा तडा गेला होता. या डब्यातील प्रवाशांना दुसऱ्या डब्यातून प्रवास करण्याची जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. याकडे तात्काळ लक्ष्य दिले नसते तर मोठी दुर्घटना घडली असती. ही ट्रेन केरळमधील कोल्लम ते चेन्नईपर्यंत धावते. सेनगोटाई स्थानकानंतर डब्यात तडा गेल्याचे आढळून आले. हा तडा चाकाजवळ असल्याने हे जास्त धोकादायक होते.
दरम्यान, शुक्रवारी ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 275 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. बालासोर येथील बहनगा बाजार स्थानकाजवळ हा अपघात झाला. येथे चेन्नईहून हावडाकडे जाणारी 12841 कोरोमंडल एक्सप्रेस लूप लाइनमध्ये उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. यानंतर कोरोमंडलचे अनेक डबे रुळावरून घसरले. हे डबे जवळून जाणाऱ्या यशवंतपूर हावडा एक्स्प्रेसला धडकले.