'फिफ्टी-फिफ्टीचं तुणतुणं काय लावलंय, सत्ता म्हणजे बिस्किट वाटते का?'

शिवसेना आणि भाजप या दोघांपैकी एकालाही पाठिंबा देणार नाही.

Updated: Nov 3, 2019, 10:01 AM IST
'फिफ्टी-फिफ्टीचं तुणतुणं काय लावलंय, सत्ता म्हणजे बिस्किट वाटते का?'  title=

हैदराबाद: शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरु असलेल्या सत्तावाटपाच्या संघर्षावर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी कडाडून टीका केली आहे. हे फिफ्टी-फिफ्टीचं तुणतुणं काय लावलंय, सत्ता म्हणजे बिस्कीट आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तुम्ही आणखी किती वाटे करणार आहात? महाराष्ट्राच्या जनतेसाठी काहीतरी वाचवून ठेवा, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. 

तसेच भाजप आणि शिवसेना यांना परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची काहीही पर्वा नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. त्यांना केवळ फिफ्टी-फिफ्टी सत्तावाटपात रस आहे. यालाच 'सबका साथ, सबका विकास', म्हणायचे का, असेही त्यांनी विचारले. तसेच महाराष्ट्रात आपण सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि भाजप या दोघांपैकी एकालाही पाठिंबा देणार नसल्याचे ओवेसी यांनी स्पष्ट केले. 

फडणवीस आणि उद्धव ठाकरे दौऱ्यावर; तहाची चर्चा लांबणीवर?

दरम्यान, शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राज्यातील सत्तावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. शिवसेना आणि भाजपमधील वादावर तोडगा काढण्यासाठी स्वत: देवेंद्र फडणवीस पुढाकार घेणार असल्याची माहिती शनिवारी समोर आली होती. दोन दिवसांत फडणवीस  उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून किंवा त्यांना भेटून चर्चा करतील, असे सांगितले जात होते. मात्र, आज देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे ही चर्चा लांबवणीवर पडली आहे.

...तर मंत्रिमंडळात 'ईडी'चा एक प्रतिनिधी सामील करावा लागेल- संजय राऊत