10 Rupees Coin: रुपया हे भारताचे चलन आहे. त्यामुळे देशभरात फक्त रुपया हे एक प्रकारचे चलन चालते. एक रुपयापासून ते पाचशेच्या नोटांची श्रेणी आहे. अगदी काश्मीरच्या टोकापासून कन्याकुमारीपर्यंत रुपया हे चलनच स्वीकारले जाते. पण असंही एक ठिकाण आहे जिथे एका चलनावर अघोषित बंदी आहे,याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? ऐकून खरं वाटणार नाही पण भिलवाडा येथे गेल्यावर तुमच्याजवळ ठेवलेली 10 रुपयांची नाणी निरुपयोगी होतील, त्यावेळी तुम्हाला हे नक्की खरे वाटेल.संपूर्ण भारतात नाण्यांसंदर्भात एकच कायदा असताना या शहरात असं काय झालंय, ज्यामुळे 10 रुपयांचं नाणं वापरलं जात नाहीय? याबद्दल जाणून घेऊया.
भिलवाड्यात दहा रुपयांची नाणी एकमेकांकडून कोणी घेत नाही. चहाच्या दुकानावर जा किंवा मोठ्या शोरुममध्ये जा. तुम्ही 10 रुपयांचं नाण दिलात तर ते स्वीकारले जात नाही. बाहेरून येणाऱ्याला हे कळल्यावर आश्चर्य वाटते. पण येथे अशी कोणती अधिकृत घोषणा झाली नव्हती किंवा कोणी हुकूमही दिला नव्हता. तरीही नागरिकांनी मिळून 10 रुपयांच नाणं न घेण्याचं ठरवलं. शहरात चहा विक्रेत्यापासून ते ऑटोचालकापर्यंत सर्वजण 10 रुपयांची नाणी घेण्यास नकार देतात. आपल्याकडे दहा रुपयाची नाणी असतील तर काय करायच? बॅंक तरी ही नाणी स्वीकारेल का? असे प्रश्न तुमच्याही मनात नक्की पडले असतील.
10 रुपयांचं नाणं न घेण्याला एक अफवा कारणीभूत ठरली आहे. गेल्या 5 वर्षांपासून या शहरात 10 रुपयांची नाणी स्वीकारली जात नसल्याचे सांगण्यात येते. ही नाणी वैध नाहीत अशी अफवा कोणीतरी अचानक पसरवली. हळुहळू ही वार्ता शहराच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचली. यानंतर कोणी याची चौकशी करुन शहानिशा करण्याचा प्रयत्न केला नाही. कालांतराने हेच सत्य म्हणून स्वीकारले गेले. तेव्हापासून आजतागायत 10 रुपयांची नाणी या विशिष्ट ठिकाणी काही उपयोगी येत नाहीत.
तुम्ही 10 रुपयाचं नाण का घेत नाही? हे तर कायद्याचं उल्लंघन आहे. असं तुम्ही त्यांना सांगायला जाल तर तुम्हाला ठराविक उत्तर मिळू शकते.ही नाणी आमच्याकडूनही कोणीच घेत नाही मग घरी ठेवून त्याचे काय करणार? असा प्रतिप्रश्न तुम्हाला विचारला जाईल. काही नागरिकांची समज आपण मान्य करु शकतो पण आश्चर्याची बाब म्हणजे शहरातील बँकाही 10 रुपयांची नाणी स्वीकारण्यास टाळाटाळ करतात, असे नागरिकांचे मत आहे.
बँक अधिकाऱ्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. आरबीआयने जारी केलेले चलन भारत भरात स्वीकारण्यास कोणीही नकार देऊ शकत नाही. असे झाल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे भिलवाडा येथे गेल्या पाच वर्षांत कोणीही तक्रार दाखल केलेली नाही, असे ते सांगतात. जर कोणी तुमच्याकडून 10 रुपयांची नाणी घेत नसेल तर तुम्ही त्याचा व्हिडिओ बनवून जिल्हा प्रशासनाला पाठवा, असे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. व्हिडिओच्या आधारे भारतीय चलनाचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल, असे बॅंक अधिकारी सांगतात.