Amit Thackeray on Uddhav Thackeray: माहिम मतदारसंघात राजपुत्र अमित ठाकरे मैदानात असल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेंच लक्ष लागलं आहे. माहीम मतदारसंघात अमित ठाकरे विरुद्ध दोन शिवसेना असा सामना होत असतानाच अमित ठाकरेंनी उद्धव काकांवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात पवार काका-पुतण्याचा वाद असतानाच आता ठाकरेंच्या काका विरुद्ध पुतण्या वाद उफाळला आबे. अमित ठाकरे यांनी आपल्या प्रचार सभेतल्या भाषणात काका उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मनसेने माझं नाव जाहीर केल्यावर शिवसेनेची यादी आली, त्यानंतर माझ्या काकांना वाईट वाटलं मी कसा मागे पडलो, म्हणून त्यांनीही उमेदवार दिला, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
"22 ऑक्टोबरला पहिली यादी जाहीर झाली. त्यात मी अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर झालो. त्यानंतर जे सुरु आहे ते ऑटो पायलेटवरच सुरु आहे. मी एवढ्या मुलाखती आणि भाषणं मी आयुष्यात कधी दिल्या नाहीत. यादी जाहीर झाल्यानंतर तीन तासामध्ये पहिल्या शिवसेनेचा उमेदवार जाहीर झाला. त्याच्यानंतर माझ्या काकांना वाईट वाटलं की मी कसा मागे पडलो? एखादं दोन दिवसात त्यांचा पण उमेदवार जाहीर झाला," असं अमित ठाकरे म्हणाले.
पुढे त्यांनी सांगितलं की, "तो उमेदवार जाहीर झाल्या झाल्या मी पहिला फोन संदीप देशपांडेंना केला. कोणी वरळीमधून माघार घेतली तर आम्ही माहिममधून माघार घेऊ असं माझ्या कानावर आलं. मला माहिती नव्हतं खरं आहे की खोटं आहे. मी पहिला फोन संदीपजींना करुन सांगितलं की माघार घ्यायची नाही. आपण उतरलोय जिंकण्यासाठी आणि जिंकायचं आहेच. ही त्रिकोणी लढाई नाही तर माझ्या समोर पाच किंवा सहा उमेदवार आहेत. 600 उमेदवार असले तरी मला फरक पडणार नाही, कारण मला माहिमकरांवर पूर्ण विश्वास आहे. माहिमकरांनी आतापर्यंत खूप सहन केलं आहे," असं अमित ठाकरे म्हणाले.
माहीममधून कुणीही उभं राहिलं तरीही जिंकून येणार असल्याचा दावाही अमित ठाकरेंनी केला आहे. अमित ठाकरेंच्या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अमित ठाकरे लहान आहेत. त्यांनी निवडणूक शांतपणे लढवावी असा सल्ला संजय राऊतांनी दिला आहे.
शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी निवडणुकीतून माघार घेण्यास नकार दिल्यानं या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत रिंगणात आहेत. तर मनसेच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे राज्यभर प्रचार सभा करत असताना त्यांनी लेकासाठीही राजकीय मैदानात उतरुन बॅटिंग केली.