Credit Score: क्रेडिट स्कोअर का असतो महत्त्वाचा? कर्ज घेण्यापूर्वी याबाबत जाणून घ्या

घर, गाडी, एज्युकेशन, मेडिकल इमरजेंसी या सारख्या गरजा भागवण्यासाठी तर कर्ज घेण्याची गरज भासते. या सर्व स्थितीत तुम्हाला कर्ज घेण्याची आवश्यकता भासली, तर क्रेडीट स्कोअर चांगला असणं महत्त्वाचं आहे.

Updated: Aug 29, 2022, 02:40 PM IST
Credit Score: क्रेडिट स्कोअर का असतो महत्त्वाचा? कर्ज घेण्यापूर्वी याबाबत जाणून घ्या title=

Credit Score: गेल्या काही महिन्यात महागाईने उच्चांक गाठला आहे. अशा स्थितीत बँक ठेवींवर अवलंबून चालणार नाही. घर, गाडी, एज्युकेशन, मेडिकल इमरजेंसी या सारख्या गरजा भागवण्यासाठी तर कर्ज घेण्याची गरज भासते. या सर्व स्थितीत तुम्हाला कर्ज घेण्याची आवश्यकता भासली, तर क्रेडीट स्कोअर चांगला असणं महत्त्वाचं आहे. क्रेडीट स्कोअर पाहून बँका कर्ज द्यायचं की नाही, ते ठरवतात. क्रेडिट स्कोअरला CIBIL स्कोर असेही म्हणतात त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी क्रेडीट स्कोअर तपासणं महत्त्वाचं आहे. चला तर मग क्रेडीट स्कोअरबाबत जाणून घेऊयात..

तुमचा क्रेडिट स्कोअर कसा ठरवला जातो?

क्रेडिट स्कोअर व्यक्तीच्या क्रेडिट रेकॉर्डच्या अहवालाच्या आधारे तयार केला जातो. क्रेडिट स्कोअर ठरवताना पाहिले जाते की, तुम्ही आतापर्यंत किती कर्ज घेतले आहे आणि ते वेळेवर फेडले आहे की नाही.  कोणत्या बँक किंवा इतर कर्ज देणार्‍या कंपन्यांकडून कर्ज घेतले आहे. तसेच क्रेडिट कार्ड इत्यादी कर्जाशी संबंधित सर्व गोष्टींची गणना केली जाते. तुमचा क्रेडिट स्कोअर जितका जास्त असेल तितके कर्ज मिळणं सोपं होतं. 

सर्व क्रेडिट ब्युरो तुमचा क्रेडिट स्कोअर जारी करतात. यामध्ये TransUnion CIBIL, Equifax, Experian आणि CRIF Highmark सारख्या  कंपन्यांचा समावेश आहे.  या कंपन्या डेटावर आधारित क्रेडिट रिपोर्ट/क्रेडिट स्कोअर गोळा करते आणि देखरेख करते. क्रेडिट स्कोअर 300 ते 900 दरम्यान निश्चित आहे. साधारणपणे 750 च्या वर स्कोअर चांगला स्कोअर मानला जातो.

दुसरीकडे, काही जणांनी कधीही कर्ज घेतलेलं नसतं किंवा ते क्रेडिट कार्ड वापरत नाहीत. अशा परिस्थितीत कर्जाशी संबंधित कोणताही इतिहास नसल्यामुळे त्यांना सहज कर्ज मिळेल, असे वाटते. पण तुमचा हा अंदाज चुकीचा आहे. क्रेडिट कंपन्यांकडे माहिती नसल्याने बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. 

क्रेडिट स्कोअर कसा सुधारायचा

क्रेडीट स्कोअर चांगला ठेवायचा असल्यास कर्ज वेळेवर भरणं आवश्यक आहे. तेवढेच कर्ज घ्या ज्याचा हफ्ता तुम्ही वेळेवर भरू शकता. क्रेडिट कार्डचा अतिवापर टाळा आणि जास्त पर्सनल लोन घेऊ नका. गरज असेल तेव्हाच कर्ज घ्या. कुणाचंही गॅरेंटर होण्यापूर्वी काळजी घ्या. कारण त्याच्या/तिच्या चुकीच्या व्यवहारामुळे तुमच्या स्कोअरवरही परिणाम होतो.