काय आहेत आरोग्य सेतू अँपचे फायदे?

कोरोनाविरोधी लढाईत पंतप्रधानांनी सांगितलेलं एक अस्त्र   

Updated: Apr 14, 2020, 04:00 PM IST
काय आहेत आरोग्य सेतू अँपचे फायदे? title=

ब्युरो रिपोर्ट :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातलं लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आणि त्यात या लढाईत नागरिकांनी नेमकं काय करायचं आहे याचंही मार्गदर्शन केलं. त्यात एक आवाहन होतं ते आरोग्य सेतू अँप डाऊनलोड करण्याचं. आरोग्य सेतू अँप डाऊनलोड केल्यानं तुम्हाला नेमका काय फायदा होणार आहे? जाणून घेऊया या अँपबद्दल.

कोरोना व्हायरसच्या धोका टाळण्यासाठी केंद्र सरकारनं हे अँप तयार केलं आहे. हा अँप तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला कोरोना व्हायरसबाबतच्या धोक्यापासून अलर्ट करेल आणि तुम्ही कोरोनापासून सुरक्षित आहात की नाही हेदेखिल सांगेल. या अँपचं वैशिष्ट्य असं की अँप लॉन्च केल्यानंतर काही दिवसांतच हे अँप एक कोटीहून अधिक लोकांनी डाऊनलोड केलं आहे.

अँप डाऊनलोड कसं कराल?

हे अँप तुम्ही गुगल प्ले स्टोअर आणि अँप स्टोअरमधून मोफत डाऊनलोड करू शकता. हे अँप अकरा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. अँप इन्स्टॉल केल्यानंतर त्यात सेटअप करणंही सोपं आहे. तुमच्या फोनमध्ये लोकेशनला Always On ठेवायचं आहे आणि Bluetooth सुद्धा चालू ठेवायचं आहे. रजिस्ट्रेशन प्रक्रिया करताना तुम्हाला फोनवर ओटीपी पाठवला जाईल आणि त्याचा तुम्हाला वापर करावा लागेल. त्यानंतर तुमच्या वैयक्तिक माहितीचा तपशील भरावा लागेल. त्यात नाव, पत्ता, वय, व्यवसाय, प्रवासाचा तपशील याशिवाय तुमच्या आरोग्याशी संबंधित काही प्रश्न विचारले जातील आणि ती माहिती तुम्हाला भरावी लागेल. तुम्हाला वाटलं तर तुम्ही २० सेकंदांची सेल्फ असेसमेंट टेस्ट करू शकता, पण ती नंतरही केली जाऊ शकते.

अँप सांगेल कोरोनाचे लक्षण आहेत की नाहीत

या अँपमध्ये सेल्फ टेस्टचा पर्याय आहे, ज्यात तुमच्या आरोग्याची माहिती मागितली जाते. या माहितीच्या आधारे तुमच्यामध्ये कोरोनाची लक्षणं असू शकतात का हे अँप सांगतं. हे अँप तुमचा तपशील सरकारला पाठवतं. त्यानंतर गरज असेल तर आरोग्य मंत्रालयाकडून तुमच्यासाठी आयसोलेशन प्रक्रिया सुरु केली जाईल. हे अँप अशा रितीनं बनवलं आहे की जर एखादा अँप युजर आपल्या जवळच्या भागात असेल आणि त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असेल तर किंवा त्याच्यात कोरोनाची लक्षणं असतील तर त्याची माहिती आपल्याला नोटीफिकेशनद्वारे दिली जाईल.

 

अँप तुम्हाला कशी मदत करेल?

जर एखाद्या अँपयुजरला कोरोनाची लक्षणं दिसली किंवा त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर दुसऱ्या आरोग्य सेतू युजरला अलर्ट केलं जाईल. हे अँप आपल्याला हेदेखिल सांगेल की तुम्ही ज्या भागात आहात तो भाग कोणत्या कोरोनाच्या झोनमध्ये आहे. जर तुम्ही हाय रिस्क झोनमध्ये असाल तर ती माहितीही अँपद्वारे तुम्हाला मिळेल. एवढंच नाही तर तुम्हाला टेस्ट करण्यासही सांगण्यात येईल. आपण याच अँपच्या द्वारे टोल फ्री नंबर १०७५ वर फोन करून टेस्ट साठी वेळ घेऊ शकता.