Bengaluru Man Marries 15 Women: मैसूर (Mysore) शहर पोलिसांनी शनिवारी बंगळुरुमधील (Bengaluru) महेश के. बी. नायक नावाच्या 35 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. महेशने फसवणूक करुन तब्बल 15 महिळांशी लग्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वत:बद्दल खोटी माहिती सांगून महिलांना आपल्या जाळ्यात ओढून महेश त्यांच्याशी लग्न करायचा. त्यानंतर त्यांची आर्थिक फसवणूक करुन तो आपलं पुढील शिकार शोधायचा असा दावा पोलिसांनी केला आहे. 2014 पासून महेशने 15 महिलांशी लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. कधी डॉक्टर तर कधी इंजिनिअर असल्याचं सांगून तो महिलांची फसवणूक करायचा. महेशने यापैकी अनेक महिलांना मॅट्रीमोनिअल साईटच्या माध्यमातून भेटल्याने पोलिसांनाही आश्चर्य व्यक्त केलं आहे. या प्रकरणामध्ये मॅट्रीमोनिअल साईटच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
आपण डॉक्टर असल्याचं दाखवण्यासाठी महेशने एक खोटं क्लिनिकही सुरु केलं आहे. महेश हा स्वत: बाणाशंकराई येथे राहतो. मात्र त्याने आपलं क्लिनिक तुमाकुरु येथे सुरु केलं होतं. आपण खरंच डॉक्टर असल्याचं वाटावं म्हणून त्याने या क्लिनिकवर एका नर्सलाही नोकरीला ठेवलं होतं. मैसूरमधील एका सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणीने केलेल्या तक्रारीच्या आधारे महेशला अटक करण्यात आली आहे.
महेशशी या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच जानेवारी 2023 ला लग्न केलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. महेश क्लिनिक स्थापन करण्यासाठी पैसे हवेत म्हणून माझा झळ करत होता. मी पैसे देण्यास नकार दिला तेव्हा महेश माझे दागिणे आणि पैसे घेऊन घरातून फरार झाला, असं या महिलेने तिच्या तक्रारीत म्हटलं होतं.
महेशला शोधण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला आणि महेश त्यात अडकला. पोलिसांनी तुमाकुरु येथून महेशला अटक केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार महेशची किमान 15 लग्न झाली आहेत. यापैकी चौघींना महेशपासून मुलंही झाली आहेत. महेशला अटक झाल्याची माहिती समोर आल्यानंतर अन्य एका महिलेने पोलीस स्टेशनला धाव घेत महेशने आपलीही फसवणूक केल्याचा दावा केला आहे.
अनेक महिलांनी महेशचं इंग्रजी ऐकून त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. अनेक महिलांनी त्याचं इंग्रजी ऐकून काहीतरी गडबड असल्याच्या शक्यतेने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिलेला अशी माहिती आम्हाला मिळाली आहे, असं पोलीस म्हणाले. महेशने ज्या महिलांशी लग्नं केली त्यांना तो फारच क्वचित भेटत असे. महेशशी लग्न केलेल्या जवळजवळ सर्वच महिला या प्रोफेश्नल आहेत. म्हणजेच पैशांसाठी त्या महेशवर अवलंबून नाहीत. महेशने फसवणूक केल्याचं समोर आल्यानंतरही यापैकी अनेक महिलांनी कधीच त्याच्याविरोधात तक्रार केली नाही, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.