नवी दिल्ली: देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या भिलवाडा मॉडेलची चांगलीच चर्चा आहे. राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात १८ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. ३० मार्चपर्यंत ही संख्या २६ वर जाऊन पोहोचली होती. मात्र, दरम्यानच्या काळात जिल्हा प्रशासनाकडून राबवण्यात आलेल्या आक्रमक उपाययोजनांमुळे गेल्या आठवडाभरात भिलवाडा जिल्ह्यात कोरोनाचा केवळ एकच नवा रुग्ण आढळून आला आहे. एवढेच नव्हे तर २७ कोरोनाग्रस्तांपैकी १७ जण पूर्णपणे बरेही झाले आहेत. त्यामुळे देशभरात भिलवाडा मॉडेलची जोरदार चर्चा सुरु आहे.
राजस्थानचे अतिरिक्त मुख्य सचिव रोहित कुमार यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, या सगळ्याची सुरुवात १८ मार्चला भिलवाडात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर झाली. यानंतर जिल्हा प्रशासनाने अवघ्या काही तासांत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करायला सुरुवात केली. यासाठी आरोग्य मंत्रालय आणि जिल्हा प्रशासनाची तब्बल ८५० पथके तैनात करण्यात आली. या पथकांमध्ये डॉक्टर्स, नर्स आणि नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या पथकांनी आतापर्यंत २० लाखाहून अधिक नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संबंधित असलेल्या सर्वांची कसून चौकशी करण्यात आली.
२६ मार्चपर्यंत या पथकांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या ६,४४५ संशयित रुग्णांना होम क्वारंटाईन केले होते. २७ मार्चपर्यंत भिलवाडा जिल्ह्यातील ३० लाख नागरिकांपैकी २२ लाख लोकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले होते. या काळात आम्ही सर्वेक्षण, शोध आणि तपासणी या गोष्टींवर भर दिला. या काळात भिलवाडा जिल्ह्यात अत्यंत कडेकोट संचारबंदी होती. जिल्ह्यातील जवळपास सर्वच दुकाने बंद होती. या काळात पोलिसांनी जीवनावश्यक वस्तूंचा साठा नागरिकांना घरपोच होईल, याची काळजी घेतली. यानंतर ३ मार्च ते १० मार्च या काळात भिलवाडात महाबंद पाळण्यात आला. या सगळ्यामुळे सुरुवातीच्या काळात भिलवाडा जिल्ह्यात वेगाने पसरणाऱ्या कोरोनाला अटकाव करण्यात यश आले.