मोठी बातमी : देशातील लॉकडाऊनचा काळ वाढवणार नाही

केंद्राचा असा कोणताही विचार नाही 

Updated: Mar 30, 2020, 10:59 AM IST
मोठी बातमी : देशातील लॉकडाऊनचा काळ वाढवणार नाही
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : कोविड 19 अर्थात कोरोना व्हायरसचा वाढता विळखा पाहता काही सध्याच्या घडीला सुरु असणारं २१ दिवसांचं लॉकडाऊन आणखी काही दिवस वाढवणार असल्याच्या बऱ्याच चर्चांनी जोर धरला. पण, थेट केंद्राकडूनच या चर्चा नाकारण्यात आल्या. 

कॅबिनेट सचिन राजीव गौबा यांनी सोमवारी लॉकडाऊन वाढवणार असल्याच्या या चर्चा परतवून लावल्या. 'ही सारी माहिती, हे अहवाल पाहून मी थक्कच होत आहे. लॉकडाऊनचा काळ वाढवण्याचा कोणचाही विचार तूर्तास नाही', असं गौबा म्हणाले. 

 

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'च्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधत कोरोना व्हायरसच्या महामारीशी लढण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आपल्यापुढे असल्याचं सांगितलं होतं. या अतिशय मोठ्या निर्णयासाठी त्यांनी देशातील नागरिकांची माफीही मागितली. गरीबांचा आपल्यावर असणारा रोष अपेक्षित असूनही कोरोनावर मात करण्यासाठीच लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

जनतेशी संवाद साधताना मोदींनी सर्वांनाच या संकटाना धाडसाने सामोरं जाण्याचं आवाहन करत आणखी काही दिवसांसाठी या लक्ष्मण रेषेचं पालन करण्याची विचारणाल केली. हा लढा कठीण असल्यामुळे त्यावर कठोर मार्गांनीच मात करणं कोट्यवधी भारतीयांच्या हिताचं असेल ही बाब त्यांनी अधोरेखित केली.